जड वाहनचालकांनो सावधान; होऊ शकतो दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:00 AM2019-09-28T06:00:00+5:302019-09-28T06:00:07+5:30
डॉ. आंबेडकर उद्यान जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथून नागपूरला जाणारे प्रवासी वाहन इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक- आदीत्य मेडीकल्स-शिवाजी चौक-धुनिवाले मठ या मार्गाने परतीचाही प्रवास याच मार्गाने करतात. तर खाद्य निगम गोदाम बरबडी येथे यवतमाळ, पुलगाव या रोडने येणारे ट्रक हे आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल-बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, गांधी पुतळा चौक मार्गे जाणे-येणे करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील विविध भागात सध्या रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण, काही महत्त्वाच्या चौकांच्या सौंदर्यीकरणासह सिमेंट नाल्यांची निर्मितीचे काम केले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शहरातील महत्त्वाच्या चार चौकातील जड वाहतूक इतर मार्गांनी वळती करण्याचे निश्चित केले आहे. सदर निर्णयावर पुढील एक महिना अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमाला बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
स्थानिक बजाज चौक भागात राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक आहे. याच ठिकाणाहून जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथून जिल्ह्याच्या चारही कोपऱ्याच्या दिशेने बसेस सोडल्या जातात. रापमच्या बस स्थानकातून आर्वी, नागपूर, सेवाग्राम मार्गे समुद्रपूर, उमरेड तसेच ग्रामीण भागात जाणारे बसेस या इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक-आदीत्य मेडिकल्स-शिवाजी चौक-आर्वी नाका-धुनिवाले मठ-गांधी पुतळा चौक यामार्गे जात असून येणारे बसेस सुद्धा याच मार्गे रापमच्या बसस्थानकात येतात. तसेच डॉ. आंबेडकर उद्यान जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथून नागपूरला जाणारे प्रवासी वाहन इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक- आदीत्य मेडीकल्स-शिवाजी चौक-धुनिवाले मठ या मार्गाने परतीचाही प्रवास याच मार्गाने करतात. तर खाद्य निगम गोदाम बरबडी येथे यवतमाळ, पुलगाव या रोडने येणारे ट्रक हे आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल-बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, गांधी पुतळा चौक मार्गे जाणे-येणे करतात. परंतु, येत्या काही दिवसांवर दुर्गा उत्सव असून या दरम्यान शहरात मोठी वर्दळ राहते. शिवाय रात्रीच्या सुमारास देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दीही होते. असे असतानाही सध्या विविध विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. सदर विकास कामांच्या निमित्ताने ठिकठिकाणी खोदकामही होत आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो. उत्सवादरम्यान विविध विकास कामेही पूर्ण व्हावी तसेच वाहतूक व्यवस्थाही कायम रहावी या उद्देशाने वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेने वर्धा शहरातील काही महत्त्वाच्या चौकातील जड वाहनांची वाहतूक इतर ठिकाणाहून वळती केली आहे. या पर्यायी व्यवस्थेच्या नियोजनबद्ध कार्यक्रमावर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रभावीपणे काम केले जाणार आहे.
जड वाहनांसाठी अशी आहे पर्यायी व्यवस्था
पूर्वी बजाज चौकातून ट्रक, ट्रॅव्हल्स आणि रापमची बस नागपूर, आर्वी व सेवाग्रामच्या दिशेने जाण्यासाठी बजाज चौक-इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक मार्गक्रमण करीत होती. परंतु, आता या वाहनांना बजाज चौक, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, सावंगी टि-पॉईंट, जुनापाणी चौक, आर्वी नाका, धुनिवाले मठ चौक मार्गक्रमण करून पुढील प्रवास करावा लागणार आहे.
नागपूरकडून येणारे जड वाहने पूर्वी धुनिवाले मठ-आरती चौक-शिवाजी चौक-आदीत्य मेडिकल्स-पोस्ट ऑफिस चौक होत बजाज चौक पर्यंत होती. तर आता या वाहनांना धुनिवाले मठ-आरती चौक-गांधी पुतळा चौक- डॉ. आंबेडकर पुतळा चौक-पोस्ट आॅफीस चौक-बजाज चौक मार्गक्रमण करावे लागणार आहे.
आर्वीकडून येणारे वाहने पूर्वी जुनापाणी चौक- आर्वी नाका चौक-शिवाजी चौक-आदीत्य मेडीकल्स- पोस्ट ऑफिस चौक होत बजाज चौक पर्यंत येत होती. तर आता या जड वाहनांना जुनापाणी चौक-आर्वी नाका चौक- धुनिवाले मठ- आरती चौक- गांधी पुतळा चौक- डॉ. आंबेडकर पुतळा चौक-पोस्ट ऑफिस चौक-बजाज चौक यावे लागणार आहे.
बरबडी येथील खाद्य निगम गोदामातून जड वाहनांना पूर्वी गांधी पुतळा-डॉ.आंबेडकर पुतळा-पोस्ट ऑफिस चौक होत वर्धा शहरात येता येत होते. परंतु, आता या वाहनांना गांधी पुतळा-आरती चौक- धुनिवाले मठ-डोडाणी चौक-येथून बायपास ने सावंगी टी-पॉईंट प्रवास करावा लागेल.