सर्व प्रलंबित रेल्वे उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार
By admin | Published: July 17, 2015 02:12 AM2015-07-17T02:12:28+5:302015-07-17T02:12:28+5:30
जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
रामदास तडस : सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाची बैठक
वर्धा : जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात खासदारांनी पुलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शिवाय प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देशही दिलेत.
विश्रामगृहात खा. तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला बांधकाम विभाग व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने वर्धा शहरातील बजाज चौक येथील वर्धा उड्डाण पुलाचे विस्तारिकरण, सिंदी रेल्वे येथील उड्डाण पूल, पुलगाव शहरातील उड्डाण पूल, केंद्र शासनाद्वारे अनुदानित केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली विविध विकास कामे, स्थानिक खासदार निधी अंतर्गत विकास कामे तसेच वर्धा जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व कामांचा आढावा खा. तडस यांनी बैठकीत घेतला. शिवाय प्रलंबित कामे मार्गी लावण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.
बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पुलांच्या विस्तारीकरणाला केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे सदर प्रस्ताव रेल्वे विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावर त्वरित तोडगा काढून प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्याच्या सूचनाही खा. तडस यांनी बैठकीमध्ये रेल्वे प्रशासनाला दिली. शिवाय अन्य कामेही जलदगतीने करण्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला दिले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता बालपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वीचे जुमडे, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)