व्हील्स इंडियात कामगारांच्या शोषणाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:45 PM2017-10-29T23:45:58+5:302017-10-29T23:46:15+5:30
देवळी येथील मे. व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण होत असल्यामुळे कामगारांत असंतोष पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी येथील मे. व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण होत असल्यामुळे कामगारांत असंतोष पसरला आहे. कामगारांनी बोनस, पगार स्लिप मिळावी, म्हणून कंपनी प्रशासनाकडे लेखी विनंती केली होती. मात्र, पाच वर्षांपासून ही मागणी मान्य करण्यात आली नाही. मागणी कराल तर कामावरून कमी करू, अशी धमकी दिली जात आहे, अशी माहिती आॅल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्यावतीने देण्यात आली आहे.
व्हील्स इंडिया कंपनीतील कामगारांच्या शोषणाविरोधात आयटक लढा उभारणार असल्याचे उटाणे यांनी सांगितले. कुठल्याही उद्योगात नियमीत अथवा कंत्राटी कामगारांना वेतन स्लिप मिळणे क्रमप्राप्त आहे. तसेच कामगारांना हेल्मेट, जोडे आदी देणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक आहे. तसा कायदाही आहे. बोनसची मागणी केली म्हणून कामावरून कमी करता येत नाही. आयटक कामगारांच्यावतीने या प्रश्नावर व्हिल्स इंडिया लि. प्रशासनाशी चर्चा करणार आहे. तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आयटकने दिली. बुधवारी देवळी येथे कामगारांची सभा दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संघटनेची १५ सदस्यीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली. प्रशासन न्याय देत नसेल तर जिल्हाधिकारी व सरकारी कामगार अधिकारी यांच्या मध्यस्तीने प्रश्न निकाली काढण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. लवकरच कामगारांच्या न्यायिक मागण्यांसाठी लढा उभारला जाईल, असा इशारा आयटकने दिला आहे.
कामगारांच्या समस्या
कंपनीत कामगारांचा प्राव्हिडंड फंड व कामगार विमा योजनेत समाविष्ट केलेला नाही. पी.एफ काढण्यासाठी कामगारांकडून २००० रूपये घेतले जातात. सर्वच कामगारांना ३३७ रूपये प्रति दिवस वेतन देण्यात येते. त्यात कामानुसार वर्गवारी नाही. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता दिला जात नाही. इएसआयचे पैसे वेतनातून कपात केले जाते. त्याचे कार्ड दिले जात नाही.