कर वसुलीत ९० हजार रुपयांच्या अफरातफरीचा आरोप
By admin | Published: April 14, 2017 02:15 AM2017-04-14T02:15:23+5:302017-04-14T02:15:23+5:30
शासनाच्या आदेशानुसार नगर परिषद, नगर पंचायतीद्वारे कर वसुलीवर जोर देण्यात येत आहे.
मुख्याधिकाऱ्यांवर आरोप : नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
समुद्रपूर : शासनाच्या आदेशानुसार नगर परिषद, नगर पंचायतीद्वारे कर वसुलीवर जोर देण्यात येत आहे. यात नगर पंचायतमध्ये डिसेंबर २०१६ पर्यंत कर वसुलीत ९० हजार २०३ रुपयांची अफरातफर झाल्याचे नगराध्यक्ष शिला सोनारे यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदनातून तक्रार केली आहे.
ज्या काळापासून मुख्याधिकारी स्वालीया माळगावे रूजू झाल्या, त्याच काळापासून ही अफरातफर झाल्याचा आरोप नगराध्यक्षांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या अफलातून कारभारानेच हा प्रकार घडला असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी कर वसुलीचे काम तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांना हे काम झेपले नसल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. केवळ हा घोळच नाही तर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही तीन महिन्यांपासून देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित मुख्याधिकारी, रोखपाल यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी विचारणा केली असता रोकड वहीनुसार डिसेंबर २०१६ पर्यंत ९० हजार २०३ रुपयांचा अपहार झाल्याचे रोखपालांनी कबुल केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या वहीत पोटकिर्द सुद्धा अपूर्ण आहे. या रोकडवहीमध्ये बरीच तफावत असल्याचे नमूद केले. यामुळे रोखपाल कोणत्याच वेतनावर व इतर बिलावर स्वाक्षऱ्या करणार नाही, असे त्याने कळविले आहे. या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या अपहाराची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी नगराध्यक्ष शिला सोनारे, उपाध्यक्ष रवींद्र झाडे, सभापती गजानन राऊत, अंकुश आत्राम, वनिता कांबळे, गटनेता मधुकर कामडी, नगरसेवक दिनेश निखाडे, नगरसेविका सुनीता सुरपाम, राजाभाऊ उमरे, पंकज बेलेकर, प्रवीण चौधरी, वर्षा बाभुळकर, सुषमा चिताडे, आशा वासनीक आदींनी केली आहे. तत्सम तक्रारीवर या सर्वांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांवर वसुलीबाबत काय कार्यवाही करतात, याकडे नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांचा ‘नो रिप्लाय’
नगर पंचायतीच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी अफरातफरीचा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या आरोबांबाबत मुख्याधिकारी स्वालीया माळगावे यांची भूमिका जाणून घेण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. यामुळे हे आरोप किती खरे आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती मिळू शकली नाही.