सिमेंट बंधाऱ्याच्या कामात गैरप्रकाराचा आरोप
By admin | Published: May 11, 2017 12:43 AM2017-05-11T00:43:08+5:302017-05-11T00:43:08+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येथे हाती घेण्यात आलेले बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सध्या बघावयास मिळत आहे.
सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : चौकशी करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येथे हाती घेण्यात आलेले बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सध्या बघावयास मिळत आहे. या कामात सिमेंटचा वापरही नाममात्र करण्यात आला आहे. झालेल्या कामावर पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकण्यात आले नाही. बंधाऱ्याच्या गुणवत्तेबाबत विविध प्रकारची चर्चा होत असल्याने तो किती दिवस टिकेल, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. सदर प्रकाराची तक्रार सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
तक्रारीतुन, गावालगत असलेल्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम गत पंचविस दिवसापासून हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू असून या कामाची साधी माहिती सुद्धा ग्रा.पं.ला देण्यात आली नाही. कामाबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारपुस केली असता उडर्वा-उडवीचे उत्तरे देण्यात येतात. कामाचे इस्टीमेट मागितले असता टाळाटाळ केली जात आहे. ग्रा.पं.ला अद्याप इस्टीमेट पोहचले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षी कारभारामुळे येथे कंत्राटदाराकरवी मनमर्जीने काम सुरू आहे. कुठल्याही अधिकऱ्यांने काम व्यवस्थीत होते की नाही याची पाहणी केली नाही. केवळ मजुरांच्या भरवश्यावर काम सुरू आहे. सुरू असलेल्या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने केवळ काम पूर्ण करून मोकळे होण्या इतकेच जबाबदारी पार पाडली जात आहे. पाणी अडवून परिसरातील जलस्त्रोत्रांची पातळी वाढवावी. पावसाळ्यात नंतर बराच काळ बंधाऱ्यात पाणी अडवून राहावे, हा या विकास कामा मागील उद्देश असला तरी त्याला हरताळ फासला जात आहे. खोलीकरण व रुंदीकरणाची कामे अद्यापही सुरू झाली नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून सरपंच निलम बिन्नोड व शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची
बोटावर मोजण्या इतक्याच दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. रुंदीरण व खोलीकरणाची कामे न झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतात पाणी घुसून शेतपिकांचे नुकसान झाल्यास जबाबदरी कुणाची असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. होत असलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे.