कचरा ‘कुंडीत’ टाकण्याची अॅलर्जी
By admin | Published: July 15, 2015 02:41 AM2015-07-15T02:41:04+5:302015-07-15T02:41:04+5:30
शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे.
सर्वत्र दुर्गंधी : सुजाण नागरिकही यादीत
वर्धा : शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे. अद्याप काही ठिकाणी अशा कचराकुंड्या नसल्याने एकीकडे नागरिक ओरड करीत आहे, तर दुसरीकडे कचराकुंड्या असूनही त्यात कचरा न टाकता कुड्यांच्या सभोवताल कचरा टाकून अनेकजण मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांना कचरा हा कचराकुंडीत टाकण्याची ‘अॅलर्जी’ झाली की काय, असा प्रश्न पडत असून यात अनेक सुजाण नागरिकही असतात.
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिकडे पहावे तिकडे प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. त्यामुळे प्रशासनाप्रती राग निर्माण होणे सहाजिकच आहे. पण याची वेगळी बाजू निदर्शनास येते. असून त्यामुळेच जास्त कचरा शहरात दिसत आहे. आणि ती म्हणजे नागरिकांना असलेली कचराकुंड्यांची अॅलर्जी.
शहरातील बहुतेक ठिकाणी कचराकुंड्या आहेत. परंतु अशा कचराकुंड्यांकडे लक्ष दिले असता या कचराकुंड्या रिकाम्या आणि त्यांच्या सभोवतालच कचरा दिसून येतो. यात ९० टक्के हा प्लास्टिक कचरा असतो हे विशेष. अनेक ठिकाणी आजही कचरा टाकण्याची सोय नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. पण ज्या ठिकाणी अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तिथे मात्र कचरा हा कचराकुंडीत न टाकता इतरत्र टाकला जातो. परिणामी दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा आल्याचे दिसते.
सोय असतानाही नागरिक कचरा योग्य त्या जागी टाकत नसल्यानेही अव्यवस्था वाढत आहे. विशेष म्हणजे यात सुजाण नागरिकांचे प्रमाणही बरेच आहे.(शहर प्रतिनिधी)