वर्धा जिल्ह्यात २०० शेतकऱ्यांना ५७० एकर जमिनीचे वाटप; जमीन खरेदीसाठी ११ कोटींचे अनुदान
By अभिनय खोपडे | Published: March 8, 2023 07:11 PM2023-03-08T19:11:29+5:302023-03-08T19:11:48+5:30
कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना
वर्धा: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबांना उत्पन्नाचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविली जाते. या योजनेतून १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत २०२ शेतकऱ्यांना ५७० एकर शेतजमीन देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरीब लाभार्थ्यांकरीता ही योजना सन २००४-०५ पासुन राबविण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत व त्यांच्यात आर्थिक स्थैर्यता निर्माण व्हावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेने असंख्य कुटूंबांना दिलासा दिला आहे. या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील तसेच दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे. विधवा आणि परितक्त्या महिलांना प्राधान्य दिले जाते. लाभार्थी १८ ते ६० वयोगटातील असावा लागतो.
या योजनेंतर्गत ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायत जमीन देण्यात येते. पुर्वी जमिनीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध देण्यात येत होते. ऑगस्ट २०१८ पासुन मात्र शंभर टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यास शेतजमीन उपलब्ध करुन देण्यात येते. योजनेच्या सुरुवातीपासुन आतापर्यंत लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी ६५८ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ५७० एकर जमीनीचे २०२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
सन २०२१-२२ मध्ये आर्वी व आष्टी तालुक्यातील ३६ एकर जिरायती व ८१ एकर बागायती जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन ४६ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. यावर्षी जमीन विक्रीच्या प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जमीन खरेदीची प्रक्रीया सुरु आहे. योजनेतून १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध झाल्याने अनेक भूमिहीन शेतमजूरांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडून आला आहे.