नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:43 PM2019-03-23T22:43:15+5:302019-03-23T22:43:41+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी २४ मार्चला होऊ घातली आहे. याकरिता विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना कंट्रोल व बॅलेट युनिटचे जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात वितरण करण्यात आले. याकरिता सकाळी ८.३० वाजताच शिक्षक व इतर कर्मचाºयांना बोलावण्यात आले होते. मात्र, संकुल परिसरात सुविधांचा प्रचंड अभाव दिसून आला.
मशीन घेण्याकरिता आलेल्या कर्मचाºयांना बसण्याकरिता पुरेशा मॅटिन नव्हत्या. सभा मंडपही अतिशय तोकडा होता. त्यामुळे कर्मचाºयांना उन्हातच जागा मिळेल तेथे जमिनीवरच बसावे लागले. पर्याय म्हणून अनेकांनी या परिसरातील वृक्षांचा आधार घेतला.
सध्या उन्हाळयाचे दिवस आहेत. तापमान दिवसागणिक वाढत असतानाच पिण्याच्या पाण्याची याशिवाय पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
परिणामी, पाण्याविनाच सकाळपासून आलेल्या महिला, पुरुष कर्मचाºयांना ताटकळावे लागले. अनेक कर्मचारी पाण्याची बाटली खरेदी करण्याकरिता परिसरात फिरताना दिसून येत होते. निवडणूक विभागाचा ‘पुअर शो’ आणि झालेली गैरसोय यामुळे शिक्षक, कर्मचाºयांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाक
ईव्हीएम मशिन वितरणाच्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे कठडे लावण्यात आले होते. याच ठिकाणी दुतर्फा दुचाकी वाहने उभी करण्यात आली होती. येथून वाट काढताना कर्मचाºयांची चांगलीच दमछाक झाली.
पिण्याच्या पाण्यासाठी कर्मचाºयांची भटकंती
जिल्हा क्रीडा संकुलात इव्हीएम मशिन वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तत्पूर्वी या जागेची प्रशासनाकडून साधी पाहणीही करण्यात आली नाही. मंडप अर्धवटच टाकलेला होता. यातही महिला आणि पुरुष कर्मचाºयांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांनी जागा मिळेल तेथे आश्रय घेतल्याचे दिसून आले. गैरसोयीबद्दल कर्मचाºयांची नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीमुळे इतर ठिकाणे हाऊसफुल्ल असल्याने कर्मचाºयांची संकुलात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
अजय धर्माधिकारी
निवडणूक विभाग, वर्धा