आंबेडकर जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी व्हावी
By Admin | Published: April 16, 2017 12:57 AM2017-04-16T00:57:09+5:302017-04-16T00:57:09+5:30
देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली.
रविकांत तुपकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा थाटात समारोप
वर्धा : देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. मग बाबासाहेबांचा जयंती दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. यासाठी आपण केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे शुक्रवारी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरातील पोलीस ग्राऊंडवर झालेल्या भव्य सोहळयात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. वर्धा शहर उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते.
याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आजच्या राजकारणातील अनेक विसंगतीवर बोट ठेवत तरुणांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवावे आणि नेत्याच्या मागे मागे करणे सोडून शिक्षण घेतले पाहिजे. विधायक कामे करावीत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवावा, असे आवाहनही यावेळी तुपकर यांनी केले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
डॉ बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समितीकडून आणि भीम टायगर संघटनेकडून यावेळी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ही रुग्णवाहिका २४ तास वर्धेकरांच्या सेवेत असणार आहे. हा लोकार्पण सोहळा जिजाबाई राऊत, नगरसेविका पद्मावती रामटेके यांच्या हस्ते पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीतर्फे मनोरंजनासोबत व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी विविध क्षेत्रातील्या मान्यवरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने वर्धेकरांनी उपस्थिती दर्शविली होती.(जिल्हा प्रतिनिधी)
भीमशाहीने आंबेडकरी जनता मंत्रमुग्ध
प्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ‘भिमशाही’ हा भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्कर्ष शिंदे व त्यांच्या संचाने एकापेक्षा एक असे सरस भीमगीत सादर केल्याने आंबेडकरी जनता मंत्रमुग्घ झाली होती. या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंड आंबेडकरी जनतेने खचाखच भरला होता. रात्री १२ वाजतापर्यंत चाललेला कार्यक्रम जसजसा बहरत गेला. तसतशी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. अखेरच्या क्षणी युवक जागीच थिरकायला लागले.