आमगावची उपक्रमशील शाळा झाली दप्तरमुक्त
By admin | Published: June 24, 2016 02:16 AM2016-06-24T02:16:09+5:302016-06-24T02:16:09+5:30
शाळेत केवळ ज्ञान असावे, दप्तराचे ओझे नसावे, असे म्हणत शासनाच्यावतीने दप्तरमुक्त शाळा करण्याचा प्रयत्न सुरू केला.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे झाले कमी : पुस्तकातील अभ्यासक्रम उतरला शाळेच्या भिंतीवर ं
अरविंद काकडे आकोली
शाळेत केवळ ज्ञान असावे, दप्तराचे ओझे नसावे, असे म्हणत शासनाच्यावतीने दप्तरमुक्त शाळा करण्याचा प्रयत्न सुरू केला. शासनाचा हा प्रयत्न सेलू पंचायत समितीच्या जामनी केंद्रातील आमगाव येथील शाळेने अस्तित्वात उतरविल्याचे दिसत आहे. या प्रयत्नातून शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. पुस्तकातील सर्वच अभ्यासक्रम शाळेत पाय ठेवताच त्या सांगत आहेत.
इंग्रजी, बालभारती, गणित, विज्ञानासह सामान्य ज्ञानाचे सर्वच विषय या शाळेतील भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. शाळेतील वर्गच नाही तर वरांडा व आवारात कुठेही नजर टाकल्यास दिसणारी चित्रे काही ना काही सांगत आहेत. इंग्रजीतील बाराखडीसह अभ्यासक्रमात असलेले समानार्थी विरोधार्थी शब्द, गणिती समिकरणे, छोटी व मोठी संख्या ओळखण्याची पद्धत, चित्रांसह फळांची नावे, मराठील मात्रा, उकार, काना यासह अनेक बाबी या भिंतीवर चित्रित केल्या आहेत. केवळ भिंतीच नाही तर खाली बसण्याच्या जागेवरही विविध गणिती सूत्र रंगविण्यात आले आहे.
शासनाच्या शैक्षणीक प्रगत महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत उपक्रमशील शाळा म्हणून आमगाव या शाळेची निवड करून ती दप्तरमुक्त, ज्ञान रचनावादी शाळा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापक विनोद पवार व शिक्षिका आशा ढाकरे यांच्या खांद्यावर टाकली. ती त्यांनी सार्थ केली. सदर शाळेत १ ते ५ पर्यंत वर्ग असून पटसंख्या ३० आहे. या शिक्षकांनी उन्हाळ्यात एक दिवस उसंस न घेता शाळेच्या भिंतीचा कोपरा न कोपरा चित्रांनी रंगवून घेतला. सर्व विषयाचे पाठ्यपुस्तकातील, बाह्य शिक्षण भिंतीवरील चित्रातून विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच शाळाबाह्य माहितीवर चित्रातून उलगडून दाखविण्याचा नाविण्यपूर्ण, वेगळ्या धारणीचा प्रयोग येथे केला आहे. शासन निर्णयाला सार्थ ठरवित गांधी विचाराची जोपासना केल्यामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात शिक्षणाचे धडे गिरविता येणार आहे.
गटशिक्षणाधिकारी संजय वानखेडे, केंद्रप्रमुख रेखा बावणे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे मदनी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कसोडे, शिक्षिका मेघा खिराळे, सरपंच प्रणाली गौळकर, शाळासमितीच्या अध्यक्षा किर्ती मिसाळ यांनीही या उपक्रमाला प्रोत्साहन व सहकार्य केल्याचे मुख्याध्यापक पवार यांनी आवर्जून सांगितले. याचा लाभ येत्या सत्रात कळणार असल्याचे बोलले जात आहे.
शासनाच्या निधीला लोकसहभागाची जोड
सदर उपक्रमाला शासनाकडून अनुदान देण्यात आले; पण उपक्रम राबविण्याकरिता ते तुटपुंजे ठरत होते. याची माहिती मुख्याध्यापकाने गावात दिली. या शाळेत आपलीच मुले जाणार असे म्हणत ग्रामस्थांनी वर्गणी करून निधी उभा केला. मुख्याध्यापकाने तंटामुक्त समितीतून मिळालेला निधी व स्वखर्चातून शाळेला काटेरी ताराचे कुंपण, गेट बसविले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून शाळेच्या आवारात कचरा पेट्या बसविल्या हात धुण्याकरिता नळाजवळ साबन नित्यनेमाने ठेवलेली असते.
खासगी शाळांच्या शिक्षण पद्धतीला छेद
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक शिकवित नाही, तिथे सुविधांचा अभाव असतो, असे म्हणत पालकांनी त्यांचे पाल्य खासगी शाळेत टाकण्याचा सपाटा सुरू केला. खासगी इंग्रजी शाळांचे हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या कथित शिक्षण पद्धतीला जामणी येथील शाळा छेद देणारी शाळा म्हणून उदयास येत आहे, अशा प्रतिक्रीया जामणी येथील गावकरी देत आहेत.