अमिर खान यांचा रानवाडीत आठ तास मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:38 PM2018-04-24T23:38:25+5:302018-04-24T23:38:25+5:30
पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा चांगलीच रंगात येत आहे. याच स्पर्धेत गावांना चेतना देणाऱ्या अंध बंडू धुर्वे याने प्रशिक्षण घेत केलेल्या कामाची दखल घेण्याकरिता सिनेअभिनेता अमिर खान कारंजा तालुक्यातील रानवाडी या गावात मंगळवारी पत्नी किरण राव यांच्यासह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा चांगलीच रंगात येत आहे. याच स्पर्धेत गावांना चेतना देणाऱ्या अंध बंडू धुर्वे याने प्रशिक्षण घेत केलेल्या कामाची दखल घेण्याकरिता सिनेअभिनेता अमिर खान कारंजा तालुक्यातील रानवाडी या गावात मंगळवारी पत्नी किरण राव यांच्यासह आले. सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० असा तब्बल आठ तास त्यांचा येथे मुक्काम होता.
सकाळी हेलिकॉप्टरने थेट ते रानवाडी गावात उतरले. येथून कारने श्रमदान करण्यात येणार असलेल्या ठिकाणी ते गेले. येथे त्यांनी बंडू धुर्वे व त्यांच्या अंध सहकाºयांसोबत श्रमदानही केले. हातात फावडे आणि टोपले घेत या दाम्पत्याने गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. येथे तब्बल तासभर श्रमदान केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला. यावेळी प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, कारंजा तहसीलदार कुमावत, गटविकास अधिकारी उमेश नंदगवळी, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे उपस्थित होते. रानवाडी या गावात गेल्यानंतर त्यांनी बंडू धुर्वे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. येथे बंडू व त्याच्या सहकाºयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. येथे बंडू याने तयार केलेले गाणेही त्यांनी ऐकले. यानंतर गावातील कोहळे यांच्या घरी जेवणही घेतले. यानंतर तब्बल सायंकाळी ४.३० वाजता ते पुढच्या प्रवासाला रवाना झाले.
डोळ्याला पट्टी बांधून खेळले क्रिकेट
रानवाडी येथे बंडू धुर्वे हा अंध असून त्याच्या सहकाऱ्यांची एक क्रिकेट चमू आहे. त्याच्या चमूतील सर्वच सहकारी यावेळी गावात आले होेते. या चमूच्या सदस्यांसोबत त्यांनी श्रमदान केले. यानंतर गावातील मैदानातच ते डोळ्याला पट्टी बांधून क्रिकेट मॅच खेळले. यात गावकºयांनीही सहभाग घेतला.