स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मंगळवारी तब्बल २.५० लाख विद्यार्थी गाणार सामूहिक राष्ट्रगीत
By महेश सायखेडे | Published: August 7, 2022 06:57 PM2022-08-07T18:57:18+5:302022-08-07T18:58:20+5:30
Independence Day: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी तसेच सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होत राष्ट्रगीत गाणार आहेत.
- महेश सायखेडे
वर्धा - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी तसेच सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होत राष्ट्रगीत गाणार आहेत.
शहरी व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा वर्धा जिल्ह्यात जागरच केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमात विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींसह माजी सैनिक तसेच नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी राहणार शालेय गणवेशात
विद्यार्थी आपला शालेय गणवेश परिधान करून या उपक्रमात सहभागी होणारे आहेत.
एनसीसी, स्काऊट-गाईड व हरित सेनेचे छात्र सैनिक त्यांच्या गणवेशात सहभागी होतील.
क्रीडा संकुलात १४ हजाराहून अधिक गाणार राष्ट्रगीत
वर्धा येथील क्रीडा संकुलात होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात दोन हजार कर्मचारी आणि तब्बल १२ हजार विद्यार्थी सहभागी होत सामूहिक राष्ट्रगीत गाणार आहेत.
मंगळवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जिल्ह्यात सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात २.५० लाख विद्यार्थी सहभागी होणार असून नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य.) वर्धा.