कारागृहातील बंदी जणांना बांधल्या राख्या, अवगुण सोडून देण्याचे आवाहन
By अभिनय खोपडे | Published: August 30, 2023 03:10 PM2023-08-30T15:10:46+5:302023-08-30T15:12:52+5:30
चांगले वागण्याचा दृढ संकल्प घेण्याचा संदेश
वर्धा :रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा व प्रजापिता ब्रम्हाकुमारी वर्धा यांच्यामार्फत जिल्हा कारागृह येथे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेच्या माधुरी दीदी, अर्पना दीदी, सुशिला दीदी यांनी बंदींं जणांना मार्गदर्शन करून राखी बांधली व भेटवस्तू स्वरूपात त्यांच्यामधील अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.
अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा येथील सिस्टर विद्या, प्राचार्य सिस्टर जेसी जोसेफ, सिस्टर जोत्सना आदी उपस्थित होते. तसेच विद्यार्थिनींनी बंदी जणांसमोर बॅन्ड पथकाद्वारे संगीत सादर करून वातावरण प्रसन्नमय केले. बंदी जणांना राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक सुहास पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी नितीन क्षीरसागर, सुहास नागमोते आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
रक्षाबंधनचे पावन पर्व अवगुण दूर करते
ईश्वर सर्वांचा पिता आहे, तो आपल्या सद्गुणांचे रक्षण करतो. तो सुखाचा सागर, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर आहे. तो मनुष्यातील अवगुणांचा नाश करतो. रक्षाबंधन साजरे करून चांगले वागण्याचा दृढ संकल्प घेण्याचा संदेश ब्रह्माकुमारीज वर्धा सेवा केंद्राच्या संचालिका माधुरी दीदींनी दिला. त्यानांतर सर्वांना रक्षासूत्र बांधले व अवगुणांची ओवाळणीसुद्धा मागितली.