केळझर येथे उत्खननात मिळाले प्राचीन अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:13 PM2018-04-02T23:13:07+5:302018-04-02T23:13:07+5:30
नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून येथे वेगवेगळ्या भागात उत्खनन करून काही प्राचीन इतिहासाचे पुरावे मिळतात काय, हे तपासत आहे. हे काम विभागप्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून येथे वेगवेगळ्या भागात उत्खनन करून काही प्राचीन इतिहासाचे पुरावे मिळतात काय, हे तपासत आहे. हे काम विभागप्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यात संबंधित विभागाचे पदव्युत्तर व रिसर्च संशोधन अभ्यासक्रमाचे १७ ते १८ विद्यार्थी सहभागी असून त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले आहे.
सध्या त्यांचे उत्खननाचे काम येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या पुर्वेकडील परिसरात सुरू आहे. त्या ठिकाणी १४ बाय ७ मीटर भूभागावर उत्खननाचे काम करण्यात आले आहे. यात प्राचीन किल्ल्यांच्या दगडी भिंती व किल्ल्याचा बुरूज मिळाला आहे. किल्ल्यातील पाणी काढण्याची व्यवस्था असलेली चिरेदार दगडांनी बनविलेली नाली मिळाली. या ठिकाणी एखादे मंदिर नग्नावस्थेतील असावे, त्याच्या सुरक्षेकरिता डागडुजी केली असावी, असा निष्कर्ष डॉ. त्रिवेदी यांनी काढला आहे. याठिकाणी घोड्यांचा सांगाडा सुद्धा मिळाला आहे. सोबतच मातीचे मडके, खेळणी, बांगड्या आदी वस्तू मिळाल्या आहेत. हे संपूर्ण अवशेष ५०० ते ६०० वर्षांहूनही पुरातन असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथे उत्खनन कार्यास सुरूवात झाली. लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. तत्पूर्वी फेब्रुवारीच्या प्रारंभी या विभागाने येथील बौद्धविहाराच्या परिसरात उत्खनन सुरू केले होते. या ठिकाणी तीन आठवड्याच्या कामात चिरेदार दगडांच्या भिंतीचा पाया, मूर्तीचे भग्नावशेष, मातीची भांडी, दगड व काचेचे मणी आदी वस्तू मिळाल्याचेही डॉ. त्रिवेदी यांनी सांगितले.
यापूर्वीही गावात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात भगवान विष्णू, भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, माता लक्ष्मी, लींगपिंड, गणेश मूर्ती आदी सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्व पाषाणमूर्ती कोरीव असल्याने सुंदर आणि मनोवेधक दिसतात. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी येथे केलेल्या उत्खननात प्राचीन अवशेष मिळाले आहेत. या प्राचीन अवशेषावरून केळझर गावाला प्राचिन ऐतिहासिक वारसा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्खननास आर्केलॉजीकल सर्व्हे आॅफ इंडियाची परवानगी असल्याने केळझरच्या लौकिकातही वाढ होणार आहे.
‘आॅर्केलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया’ची परवानगी
येथील उत्खनन नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व पदव्युत्तर व रिसर्च शाखेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासाचा भाग आहे. असे असले तरी यास ‘आॅर्केलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया’ यांची परवानगी आहे. या ठिकाणी सर्व उत्खननात प्राप्त अवशेषांच्या माहितीचा अहवाल विभागाला पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रीती त्रिवेदी यांनी सांगितले.