अन् तहसीलदारांनी दिली आपली खुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:33 AM2018-10-07T00:33:15+5:302018-10-07T00:33:44+5:30
खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खेळ अनेकांचे मनोरंजन करणारा तर कित्येकांच्या भुवया उंचावणारा ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खेळ अनेकांचे मनोरंजन करणारा तर कित्येकांच्या भुवया उंचावणारा ठरला. चक्क तहसीलदारांनी आपली खुर्ची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षासाठी बहाल केली. या घटनेची चर्चा सबंध जिल्ह्यात सध्या पसरली आहे.
१ आॅक्टोबरला संजय गांधी योजना समितीचे तालुका अध्यक्ष हरीश पारसे यांनी तहसीलदार महेंद्र सोनुने यांच्याशी संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील दुरवस्थेबाबत चर्चा केली. संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यालयात बसण्यासाठी अध्यक्षाला खुर्ची नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून मागूनही दिल्या जात नसल्याची संतप्त भावना व्यक्त केली.
जुन्या तहसील कार्यालयाच्या गोडावूनमध्ये तीन खुर्च्या आहे. त्यापैकी एक खुर्ची देण्याबाबत मी चपराशाला सांगितले होते, असे तहसीलदार सोनुने यांनी पारसे यांना सांगितले. मात्र चपराशानेही अध्यक्षाला खुर्ची पोहोचवून दिली नाही. हे तहसीलदारांच्या लक्षात आले. चपराशाला सांगूनही त्याने खुर्ची पोहोचवून दिली नसल्याने ते व्यथित झाले व स्वत: तहसीलदारांनी खुर्चीवरून उठून चपराशाला सांगून स्वत:ची खुर्ची अध्यक्षाला पोहोचवून दिली व स्वत: साध्या खुर्चीत बसून कामकाज सुरू केले.
संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षांनी तहसीलदारांनी पाठविलेली खुर्ची परत पाठविली. त्यानंतर एकच धावपळ उडाली. नायब तहसीलदार तीनघसे यांनी एका रिक्त असलेल्या नायब तहसीलदाराची खुर्ची सं.गा.यो. समितीच्या कार्यालयात पाठवून समितीच्या अध्यक्षाच्या बसण्याची व्यवस्था केली. सेलूचे तहसीलदार प्रसंगी स्वत:ची खुर्ची दुसऱ्याला देवू शकते याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे. तहसील कार्यालयाला सध्या स्वत:ची इमारती नाही. इमारतीचे बांधकाम रखडून पडले आहे. त्यामुळे एका छोट्या इमारतीत हे कार्यालय चालविले जात आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अनेक लाभार्थी दररोज येतात. त्ंनाही जागा अपुरी पडत आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा मी अध्यक्ष आहे. त्या कार्यालयात निराधारांची प्रकरणे लवकर मार्गी लागावी म्हणून माझी एक टेबल-खुर्ची तेथे असावी ही माझी अपेक्षा होती. कित्येक महिन्यांपासून खुर्ची मला देण्यात आली नाही म्हणून मी ती मागण्यासाठी गेलो तर तहसीलदारांनी ही माझीच खुर्ची घ्या म्हणत सं.गा.यो. कार्यालयात पाठवून दिली.
- हरीश पारसे, अध्यक्ष, सं.गा.यो. समिती, सेलू तालुका