अन् तहसीलदार पाहोचले ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत
By admin | Published: January 8, 2017 12:41 AM2017-01-08T00:41:43+5:302017-01-08T00:41:43+5:30
येथील शेतात ऊसाची तोड करण्याकरिता आलेल्या परिवारातील चिमुकलींची शिक्षणाची व आरोग्याची दैना होत असल्याची माहिती
शाळाबाह्य मुलांच्या नोंदी घेणे सुरू : पाटी, पुस्तकाची प्रतीक्षा
आकोली : येथील शेतात ऊसाची तोड करण्याकरिता आलेल्या परिवारातील चिमुकलींची शिक्षणाची व आरोग्याची दैना होत असल्याची माहिती ‘लोकमत’च्या वृत्ताने उजागर होताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांची चौकशी झाली तर शनिवारी खुद्द तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी या कामगारांच्या वसाहतीला भेट देत पाहणी केली.
त्यांच्या पाहणीत या कामगारांच्या मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रासल्याचे दिसून आले. तसेच या कामगारांच्या घरात असलेल्या गरोदर मातांना कुठल्याही आरोग्य सेवा मिळाल्या नसल्याचे समोर आले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती तत्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांना या कामगारांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना केल्या.
तत्पूर्वी या प्रकाराची माहिती जि.प. शिक्षण विभागाला या कामगारांच्या वसाहतीवर जात विद्यार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश मिळताच जामनी येथील ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत जात शिक्षक शालीक शेंडे, रविंद्र केने यांनी शाळाबाह्य मुलांची नावे नोंदवून घेतली; ते त्या वेळी येथे गेले त्यावेळी अनेक मुलं रात्रीलाच आई वडिलांसोबत फडात गेल्याने नोंदी घेणे बाकी आहे.
येथील साखर कारखाना परिसरात मराठवाडा व विदर्भातील पुसद व यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मुलांबाळांसह आले आहेत. येथे आलेली मुलं आपापल्या गावात शाळेत शिकतात; पण येथे आल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्याबाबत दोन दिवस ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे शासनाने अशा सर्व मुलांची हजेरी रजिस्टरवर नोंद करून या मुलांना संबंधीत शाळेत पाटी, पुस्तक, पेन देवून बसविण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
जिल्हाधिकारीही देणार वसाहतीला भेट
या वसाहतीला आज तहसीलदार डॉ. होळी यांनी भेट देत चौकशी केली. त्यांना येथे दिसलेल्या विदारक स्थितीची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर जिल्हाधिकारीही या वसाहतीत भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पहिली ते सातवीपर्यंतचे २० विद्यार्थी
शिक्षक शेंडे व केने यांनी केलेल्या सर्व्हेत येथे १०४ कुटुंब वास्तव्यास आहे. ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत वर्ग पहिली ते सातवीपर्यतचे २० विद्यार्थी आढळले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाच्या नोंदी घेण्यात आल्या आहे. येथील अनेक मुलं मुली रात्रीच आई वडिलांसोबत ऊसाच्या फडात गेले असल्याने त्यांच्या नोंदी होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
नोंदी करून सुविधा देण्याची गरज
या वसाहतीत आढळलेल्या २० चिमुकल्यांना प्रत्यक्ष त्यांच्या हातात पुस्तक, पाटी व पेन देवून ज्ञानाजर्नाचे धडे देण्यात येते. हे आगामी काळच सांगणार आहे.