अन् ‘त्या’ वृद्ध दाम्पत्यासाठी रेल्वे गाडी थांबली !
By admin | Published: March 30, 2016 02:24 AM2016-03-30T02:24:53+5:302016-03-30T02:24:53+5:30
मदत केव्हा आणि कशी करावी हे महत्त्वाचे. ती अडचणीत सापडणाऱ्याला अचानक मिळाली तर ते एक मोठे कार्य ठरू शकते. ती चर्चेचा विषयही ठरते.
गार्डचा मानवतेचा परिचय : वर्धा स्थानकावरील घटना
वर्धा : मदत केव्हा आणि कशी करावी हे महत्त्वाचे. ती अडचणीत सापडणाऱ्याला अचानक मिळाली तर ते एक मोठे कार्य ठरू शकते. ती चर्चेचा विषयही ठरते. अशीच मदत मंगळवारी रेल्वे गार्डने केल्यामुळे एका वृद्ध दाम्पत्याला रेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला निघालेली रेल्वे गाडी मिळाली.
वेळ रात्री सात सव्वासातची. वर्धा रेल्वे स्थानकावर पुरी-अजमेर रेल्वे गाडी येऊन थांबली. काही वेळातच ती प्रवाश्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली. गाडी रेल्वे स्थानक सोडत असतानाच एक वृद्ध दाम्पत्य ती गाडी पाहून जोरजोराने अजमेर....अजमेर...म्हणून आवाज देत होते. हे दाम्पत्य ६५ ते ७५ वयातील असावे. गाडी सुटली होती. अशातच शेवटच्या डब्यात असलेल्या गार्डचे त्या दाम्पत्याकडे लक्ष गेले. त्यांचे आवाज देणे सुरूच होते. अखेर ते हतबल होऊन गाडीकडे बघत होते. या दाम्पत्याची व्यथा त्या गार्डच्या लक्षात आली. गार्र्डने त्यांच्याकडे हात दाखवून तिथेच थांबण्याचा सल्ला दिला आणि त्याच क्षणी वॉकीटॉकीच्या माध्यमातून चालकाशी संवाद साधला. काही क्षणातच गाडी थांबली. आणि त्या दाम्पत्याला गाडीत चढवून घेतले. त्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. अखेर शेवट गोड झाला. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील प्रवासी बघत होते. अनेकदा अनेकांची गाडी सुटते. यासाठी रेल्वे कर्मचारी बांधील नाही. मात्र त्या गार्डने दाखविलेले औदार्य कौतुकास पात्रच ठरले नाही, तर मानवीयतेचा परिचय देणारे ठरले. प्रत्येकजण काही क्षणात घडलेल्या या घटनेचीच चर्चा करीत होते.(जिल्हा प्रतिनिधी)