अंगणवाडी सेविकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:35 PM2019-02-11T22:35:28+5:302019-02-11T22:36:02+5:30
सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वर्धा शहरातील शास्त्री चौक येथून निषेध मोर्चा काढला. या मोर्चाने वर्धा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर तेथेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले असून सदर आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वर्धा शहरातील शास्त्री चौक येथून निषेध मोर्चा काढला. या मोर्चाने वर्धा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर तेथेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले असून सदर आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मानधन वाढ तात्काळ लागू करण्यात यावी. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वैद्यकीय चाचणीची अट रद्द करण्यात यावी. २०१० नंतर तिसरे अपत्य झालेल्यांची सेवा कायम ठेवावी. अंगणवाडीकरिता लावलेली २५ विद्यार्थी संख्येची अट रद्द करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाºयांना लावलेल्या मोस्मा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस, पर्यवेक्षक यांच्या शेकडो जागा रिक्त असून त्या तात्काळ भरण्यात याव्या. २०१६ पासून अंगणवाडी सेविकांना प्रवास भत्ता अदा करण्यात आला नसून तो देण्यात यावा. सेवासमाप्तीनंतर मिळणाºया रक्कमेत दुपट्टीने वाढ करावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष विजया पावडे, जिल्हा संघटक असलम पठाण, सिटूचे भैय्याजी देशकर, सिताराम लोहकरे, अर्चना मोकाशी यांनी केले. आंदोलनात रंजना सावरकर, गुंफा कटारे, कल्पना चहांदे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, मैना उईके यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले.
ठाणेदारांनी स्वीकारले मागण्यांचे निवेदन
स्थानिक शास्त्री चौक येथून निघालेला मोर्चा दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला. पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे ८०० आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत तेथेच स्थानबद्ध केले. यावेळी आंदोलनाने नेतृत्व करणाºया दिलीप उटाणे, सिताराम लोहकरे, भय्याजी देशकर यांच्यासह काही अंगणवाडी सेविकांनी आपली मनोगत व्यक्त केली. काहींनी मनोगत व्यक्त करताना दारूबंदी आणि वर्धेतील पोलीस प्रशासन या विषयाला अनुसरून काही मजेदार किस्सेच सांगितले. इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही ताशेरे ओढले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार चंद्रकांत मदने यांना सादर केले. त्यांनीही निवेदन स्वीकारताना आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या रास्त असून आपण सदर निवेदन संबंधितांना पाठवून असे सांगितले.