अंगणवाडी सेविका न्याय्य मागण्यांसाठी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:27 PM2017-08-28T22:27:48+5:302017-08-28T22:28:11+5:30
अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी स्थानिक पॅथर चौक भागात सोमवारी आयोजित मासिक सभेवर सामूहिक बहिष्कार टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी स्थानिक पॅथर चौक भागात सोमवारी आयोजित मासिक सभेवर सामूहिक बहिष्कार टाकला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी करीत मागण्यांवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करून त्यांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन अधिवेशन काळात ना. पंकजा मुंडे यांनी दिले होते. त्या आश्वासनाची अद्यापही पुर्तता न झाल्याने अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. हिंगणघाट येथील बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर आता सोमवारी स्थानिक पॅथर चौक भागात आयोजित बैठकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात समाधानकारक वाढ करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाºयांना इतर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोई-सुविधा देण्यात याव्या. देण्यात येणारे मानधन प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात जमा करण्यात करावे. अधिवेशन काळात देण्यात आलेल्या आश्वासनाची तात्काळ पुर्तता करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आजच्या अदोलनाचे नेतृत्त्व कामगार नेते दिलीप उटाणे यांनी केले. आंदोलनात माला भगत, सुजाता घोडे, निर्मला सातपुडके, प्रज्ञा ढाले, रजनी पाटील, अर्चना तामगाडगे, देविका शेंडे, वंदना रामटेके, अर्चना वानखेडे, संगीता मोरे, मंगला भगत, विजया रहाटे, सुमन घोडखांदे, सुवर्णा बावनकर, सरला मून, ज्योती लाटकर, शोभा ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.