साहित्य अंगावर पडल्याने अंगणवाडी सेविका जखमी
By Admin | Published: April 18, 2015 01:56 AM2015-04-18T01:56:01+5:302015-04-18T01:56:01+5:30
शासनाच्या योजनेनुसार अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेल्या साहित्याचे डबे उचलण्याकरिता पाठविलेली अंगणवाडी सेविका अंगावर डबे पडल्याने जखमी झाले.
वर्धा : शासनाच्या योजनेनुसार अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेल्या साहित्याचे डबे उचलण्याकरिता पाठविलेली अंगणवाडी सेविका अंगावर डबे पडल्याने जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी अंगणवाडी सेविकेचे नाव उषा शंभरकर असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवळी पंचायत समितीच्या प्रकल्प कार्यालय-२ मध्ये मुलांना देण्याकरिता विविध प्रकारच्या सामग्री आल्या आहेत. या सामग्री अंगणवाडी केंद्रात पोहोचविण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची असताना त्याने हे साहित्य पंचायत समितीत उतरविले आहे. यामुळे प्रकल्प कार्यातून साहित्य नेण्याकरिता सेविकांवर अधिकाऱ्यांकडून दबाव टाकण्यात येत आहे. यातच आज सेलू काटे येथील अंगणवाडी सेविका उषा जितेंद्र शंभरकर या गेल्या असता साहित्याचे डबे त्यांच्या अंगावर पडले. यात त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत एकाही अधिकाऱ्याने रुग्णालयात येत त्यांची भेट घेतली नसल्याचा आरोप संघटनेचे दिलीप उटाने यांनी केला आहे. देवळी पंचायत समितीत साहित्य उचलण्याकरिता अंगणवाडी सेविकांनी यापूर्वीच नकार दिला होता. असे असताना अधिकाऱ्यांकडून जबरदस्ती होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.(प्रतिनिधी)