‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:17 AM2018-04-18T00:17:21+5:302018-04-18T00:17:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू शेकापूर येथील सिद्धार्थ मुन व त्याच्या सहकाऱ्यांनी एका अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केला. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे मंगळवारी अंगणवाडी सेविकांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करीत अंगणवाडी सेविकांनी शास्त्री चौक ते बजाज चौक पर्यंत मानवी साखळी तयार केली होती.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव श्याम काळे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान सभेचे अरुण वनकर, अंनिसचे गजेंद्र सुरकार, बी. के. जाधव, सिद्धार्थ तेलतुंबडे, ममता सुदरकर, दिलीप उटाणे, असलम पठाण, उषा चरभे आदींची उपस्थिती होती. सदर मेळाव्या दरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांसह काही अंगणवाडी सेविकांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करणाºयांनी अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.
सदर मेळाव्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी सेलू येथील अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाºया आरोपीला त्वरित अटक करावी, या प्रकरणात प्रभावी कारवाई करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. शुभांगी उईके मृत्यू प्र्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मेळाव्याला देवराव चवळे, मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, शबाना शेख, मैना उईके, मंगला इंगोले, सविता लुटे, वनिता कापसे, रचना जाधव, सिंधु खडसे, विणा पाटील, जयश्री चहांदे, नयन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.
पोलिसांनी नाकारली मोर्चाची परवानगी
अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार १७ एप्रिला वर्धा शहरातून मोर्चा काढण्याचे आयटकच्यावतीने निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी रितसर आवेदनही केले. परंतु, शहर पोलिसांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात ‘एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने आंदोलन सहेतुक जानीव पुर्वक करीत असल्याचे गोपनिय माहितीवरून आढळून आलेले आहे. तरी १७ रोजी मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात येऊ नये’ असा अहवाल पाठविला आहे. त्यामुळे उपविभागीय महसूल अधिकाºयांनी मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे आयटकच्या पदाधिकाºयांनी सांगितले.