संतप्त नागरिक जिल्हाकचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:40 PM2018-05-14T22:40:52+5:302018-05-14T22:41:05+5:30
शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा / आकोली : शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्याकडून वाघाचा बंदोबस्त करण्यासह मृतकाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तत्पूर्वी रविवारी रात्री परिसरातील संतप्त नागरिक आणि पोलिसांत चांगलाच वाद झाला.
आज आमगाव व परिसरातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत या विषयावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान मृतकाच्या कुटुंबियाला चार लाख रुपये आता व चार लाख रुपये आठ दिवसांनी देवू, शिवाय मृतकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना दिले. या आश्वासनावर गावकरी गावाकडे परतले. मागण्या दुर्लक्षित झाल्या असत्या तर गावकºयांकडून चेतनचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याची तयारी गावकºयांची होती. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर चेतन याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी व वन्यजीव विभागाने पाठ फिरविली. केवळ प्रादेशिक विभागाच्या अधिकाºयांची व गावकºयांची येथे उपस्थिती होती.
पोलिसांचा उद्दामपणा
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकºयाचे कुटुंब घटनास्थळी गेले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांच्याकडून घटनास्थळाकडे धाव घेण्यात आली. घटनेमुळे नागरिक संतप्त असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे व ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांनी त्यांची समजूत घातली. पण गावकरी मृतदेह न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी रात्री १२ वाजता राज्य राखीव पोलीस दलाने बळाचा वापर करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी झालेल्या वादात मृतकाचे वडील दादाराव व भावाला पोलिसांकडून मारहाण झाली. सकाळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिल्याने कुटुंबिय आज सकाळी रुग्णालयात मृतदेह स्विकारण्यासाठी गेले.
वनविभागाच्या पत्राला वन्यजीव विभागाचा ठेंगा
आमगाव (जंगली), बोगावा (गोंडी), सुसूंद हा भाग न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. यामुळे या भागात वन्यप्राण्यांची ये-जा असते. यात वाघांचाही समावेश आहे. याचा त्रास गावकºयांना झाल्यानंतर वनविभागाने वन्यजीव विभागाला वाघ सांभाळण्याचे एक पत्र दिले होते. त्या पत्राला वन्यजीव विभागाकडून ठेंगा दाखविल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.