संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर
By admin | Published: June 6, 2017 01:08 AM2017-06-06T01:08:51+5:302017-06-06T01:08:51+5:30
शेतकरी संपात सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद असला तरी जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांसह विविध संघटनांकडून जिल्हाभर आंदोलन : बंदला वर्धेत संमिश्र प्रतिसाद; बाजार सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी संपात सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद असला तरी जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. पोहणा, जाम, केळझर व वायगाव (निपाणी) तर सायंकाळी पवनार येथे रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान देवळी येथे शिवसेनेच्यावतीने शेतकरी संपाना पाठींबा दर्शविणारे निवेदन तहसीलदारांना सादर केले. तर सिंदी (रेल्वे) येथे मूक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना सादर केले. किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.
आश्वासनावर शेतकरी संप संपल्याची चर्चा सुरू असताना शेतकऱ्यांकडून मागणी पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. आज राज्यात बंद पुकारण्यात आला होता. यात वर्धेतील शिवाजी चौक परिसरात भूमिपूत्र शेतकरी संघटना, प्रहार व युवा सोशन फोरमच्यावतीने शासनविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी गांधीगिरी करीत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फूल देत शेतकरी संपाला पाठींबा देण्याची विनंती केली. यावेळी प्रशांत देशमुख, सचिन घोडे, सुधीर पांगुळ, स्वप्नील देशमुख, कैलाश घोडे, अतुल पालेकर, प्रवीण काटकर, रितेश घोंगरे यांची उपस्थिती होती.
पवनार येथे सायंकाळी शिवसेनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर भाजीपाला व दूध टाकून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी नागपूर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोहणा येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ता रोको केला. या आंदोलनात माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, संचालक विनोद वानखेडे, माजी पं.स. सदस्य दिवाकर वानखेडे, उपसरपंच राहूल वानखेडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
केळझर येथे शासनविरोधी घोषणा देत वर्धा-नागपूर महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजुला चार ते पाच किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मिलींद हिवलेकर, डॉ. इर्शाद शेख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंदी (रेल्वे) व सेलू पोलिसांनी घटनास्थळी येवून परिस्थिती हाताळली.
समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्ता येथे चक्काजाम करीत रस्त्यावर दूध व भाजीपाला टाकून शासनाचा निषेध केला. येथील कृषी केंद्रचालकांनी त्यांनी दुकाने स्वयस्फूर्तीने बंद ठेवली होती. जाम येथे स्वराज इंडिया पार्टीचे प्रा. ज्ञानेश्वर वाकूडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यामध्ये लोकजन शक्ती पार्टी, बहुजन समाज पार्टी, लोकसाहित्य परिषद, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी पक्षाचा सहभाग होता. या बंदमुळे तारसभर वाहतूक खोळबली होती. ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, उमेश हरणखेडे, चेतन मराठे यांनी कार्यकर्त्याना स्थानबद्ध करून सोडले.
वायगाव (निपाणी) येथे शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देण्यासाठी वायगाव चौफुली येथे सरोज काशीकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी, माजी जिल्हा प्रमुख सुभाष बोकडे, पांडुरंग भालशंकर, दत्ता राऊत, धोंडबाजी गावंडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत ठाकूर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवळीत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देत बंदचे आवाहन केले. त्यानुसार व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवदेन तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना सादर केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनंत देशमुख, तालुका प्रमुख महेश जोशी, निलेश मोटघरे, प्रवीण कात्रे, अतुल अंबरकर, सुशील उमरे व पदाधिकाऱ्यांनी दिला.