संतप्त महिलांची पोलीस ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:16 PM2019-07-13T22:16:09+5:302019-07-13T22:17:04+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र, पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. दारूविक्रेत्यांच्या कृत्याविषयी पुष्पा विनायक कुबेकर मुलासह पोलिसांत तक्रार करायला गेल्या. मात्र, डायरी अंमलदार रूपचंद भगत यांनी तक्रार नोंदवून न घेता त्यांना परत पाठविले. मार्गावर दारूविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शनिवारी शंभरावर संतप्त नागरिकांनी सरपंच, उपसंरपचासह पोलिसांना निवेदन सादर केले.
जमावाच्या भावना लक्षात पोलिसांनी तत्काळ संघमित्रा पवार, अर्मपाल पवार, सुचिला पवार, आश्विनी काळे, मनोज काळे यांना अटक केली. मात्र, एक जण फरार होण्यास यशस्वी झाला.
जाम येथील सरपंच सचिन गावंडे, उपसरपंच अजय खेडेकर, सदस्य राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सनी निवटे, गजानन मुंगसे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर किन्हेकर, विनायक कुबेकर, राणी कुमरे, वैष्णवी देवतळे, किशोर कुंभेकर, वृषभ किनकर, आदित्य मडावी, राहुल येनोरकर, हिरा सातरकर, नंदा मडावी, सोनू रामटेके, ज्योती कुभरे, निर्मला फाले यांच्यासह शेकडो नागरिकांनी डीबी पथकाचे अरविंद येनोरकर यांना निवेदन दिले.
येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराचा दारूविक्रेत्यांवर कोणताही वचक नाही. त्यामुळे या व्यवसायाला उधाण आले आहे. पोलिसांचे दारूविक्रेत्यांना अभय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
समुद्रपूर येथील गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळेच्या परिसरासह अन्य शालेय परिसरात राजरोसपणे दारूविक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाम, कानकाटी, नंदोरी, शेडगाव पाटी, वायगाव (गोंड) वायगाव (हळद्या) येथेही मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसायाला ऊत आला आहे. नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांपुढे अवैध दारूविक्रीला आळा घालण्याचे आव्हान आहे. दारूविक्रेत्यांवरील कारवाईकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती नाही. वर्धा येथे महत्त्वाच्या बैठकीकरिता गेलो होतो. त्यानंतर लगेच १५ मिनिटांनी ११ तारखेला अतिक्रमण जागेवर वसलेल्या व्यक्तीची तक्रार आली होती. शनिवारी तातडीने पोलिसांना पाठवून पाच आरोपींना अटक केली. त्यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेमंत चांदेवार, ठाणेदार, समुद्रपूर
या प्रकरणातील दारू व्यावसायिक विकी पवार हा मागील दहा दिवसां पासून आम्हाला पोलिसां धाक दाखवितो. पोलीस माझे आहेत, मी घरात घुसून मारेल, अशी धमकी देतो .
रमा येनोरकर, महिला.