महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:29 IST2023-04-13T12:26:25+5:302023-04-13T12:29:51+5:30

रीतसर परवानगीने होत आहे सभेचे आयोजन

Anil Deshmukh says Maha Vikas Aghadi Vajramuth Meeting Is A Threat To Bjp | महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’चा भाजपने घेतला धसका - अनिल देशमुख

वर्धा : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध महाविकास आघाडीने राज्यभरात सहा ‘वज्रमूठ सभा’ घेण्याचे नियोजन केले आहे. नुकतीच संभाजीनगरमध्ये झालेली पहिलीच विराट सभा पाहून भारतीय जनता पार्टीने धसका घेतला आहे. म्हणूनच नागपुरातील सभेला विरोध करण्याचा खटाटोप चालविला आहे; परंतु, सर्व परवानगीनिशी या सभेचे आयोजन होत असून ती यशस्वीही होईल, असा विश्वास माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भात ते वर्ध्यात आले होते. त्यांनी वर्ध्यातील शिववैभव सभागृहात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सभेकरिता वर्ध्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील, या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता सदस्य नोंदणी आणि बुथ कमिटी तयार करण्यासंदर्भातही आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, समीर देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, माजीमंत्री सुबोध मोहिते आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मंत्रिमंडळ अयोध्येत

राज्यामध्ये काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी करणे आवश्यक असताना, या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्याचं मंत्रिमंडळ अयोध्येला रवाना झाले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती जिव्हाळा आहे, हे लक्षात येते. या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम केले. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर हाेणाऱ्या अहवालावर तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आ. अनिल देशमुख यांनी केली.

Web Title: Anil Deshmukh says Maha Vikas Aghadi Vajramuth Meeting Is A Threat To Bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.