इमारत पूर्ण होऊनही पशु दवाखाना भाड्याच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:35 PM2018-07-02T22:35:24+5:302018-07-02T22:35:43+5:30
जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे.
लाखो रूपये खर्च करून सुसज्ज अशी प्रशस्त परिसरात इमारत उभी राहिली, इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. मोठ्या स्वरूपात सुरक्षा भिंत बांधून आवागमनासाठी लोखंडी दरवाजाही बसविण्यात आला. पण त्या उभ्या असलेल्या इमारतीत दवाखानाचा गेला नसल्याने ती इमारत बेवारस स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. लोखंडी दरवाजा तुटलेला आहे. इमारतीचा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण झाले असताना किरायाच्या जागेवर असलेला दवाखाना या इमारतीत स्थलांतरीत का करण्यात आला नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
घोराड येथे द्वितीय श्रेणीत असलेला पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी शासन उद्घाटनाचा मुहूर्त तर शोधत नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेखाली उभी राहिलेली इमारत महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय विभागास हस्तांतरीत करण्यात आली नसल्याने दवाखान्याची सुसज्ज इमारत पांढरा हत्ती ठरत आहे. दोनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून गोपालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास पुढाकार न घेतल्यास त्या इमारतीला नुकसानीचे ग्रहण लागल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आहे.
तालुक्यात अनेक इमारती अपूर्ण स्थितीत
सेलू तालुका मुख्यालयात अनेक शासकीय इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.पंचायत समिती परिसरात पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या इमारती अजूनही बांधून झालेल्या नाहीत. तहसील कार्यालयासह आरोग्य कर्मचाºयांच्या निवासस्थान इमारतीचाही यात समावेश आहे. लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे जनता हताश आहे.