जनावरांचे खाद्य मनुष्याच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:02 PM2019-01-12T22:02:21+5:302019-01-12T22:03:33+5:30
समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी): समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
कुठलेही कुटुंब आर्थिक अडचणीमुळे उपाशी राहू नये या उद्देशाने गरजू व विविध योजनेतील लाभार्थी ठरणाºया कुटुंबियांना शासनाच्यावतीने अतिशय अल्प दरात गहू, तांदूळ व डाळ तसेच साखर वितरीत केली जाते. मात्र, गरिबांच्या वाट्याच्या या शासकीय धान्यावर धनदांडग्यांचा व शासकीय धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचा डोळा राहत असल्याचे अनेक कारवाईत पुढे आले आहे. असे असले तरी साधे जनावरही खाणार नाही असे निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य सध्या येथील स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.
येथील गजानन रंदळे हे स्थानिक स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांना निकृष्ट दर्जाचे गहू देण्यात आला. विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागातील लाभार्थ्यांना नेहमीच निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य वितरीत करण्यात येत असल्याच्या तक्रारी असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आहे.
नव्या प्रणालीने वाढविली डोकेदुखी
स्वस्त दुकानात शासकीय धान्य घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून तुमची आर. सी. नसल्याचे सांगत धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते. इतकेच नव्हे तर यंदा धान्य वेळीच आले नसून काही दिवसांनी या असेही सांगण्यात येते. शासनाच्यावतीने धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी सध्या नवीन प्रणालीचा वापर होत आहे. परंतु, ही प्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थ्यांच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे.
विरुळ येथील स्वस्त धान्य दुकानात गेलो. दुकानदाराने धान्यही दिले. परंतु, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. विचारणा केली असता वरूनच तसा माल आल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले. निकृष्ट दर्जाचे हे शासकीय धान्य खाऊन आम्ही आता आमची प्रकृती बिघडवायची काय?
- गजानन रंदळे, लाभार्थी, विरुळ
मी आज दुकानात नव्हतो. शासकीय धान्याचा माल दुकानापर्यंत आणताना एखादे पोते खराब आले असावे. शिवाय त्यातीलच धान्य वाटप करण्यात आले असावे. लाभार्थ्याने ते निकृष्ट दर्जाचे धान्य परत द्यावे त्यांना दुसरे गहू देण्यात येईल.
- मधुकर माजरखेडे, स्वस्त धान्य दुकानदार, विरुळ.