पीठगिरणी व्यावसायिकाने जोपासले असेही पशुप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:34 PM2018-04-29T23:34:28+5:302018-04-29T23:34:28+5:30
सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. या उन्न्हात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होते तर गुरांना किती भटकावे लागत असेल, याचा अंदाज येते ही बाब लक्षात घेत न्यू कुर्ला परिसरातील प्रशांत सरदार हा पिठगिरणी व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने ...
श्यामकांत चिचाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : सूर्य आग ओकत आहे. उन्हाची काहिली वाढत आहे. या उन्न्हात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होते तर गुरांना किती भटकावे लागत असेल, याचा अंदाज येते ही बाब लक्षात घेत न्यू कुर्ला परिसरातील प्रशांत सरदार हा पिठगिरणी व्यावसायिक मागील कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने गुरांना पाणी पाजून पशुपे्रम जोपासत आहे. सोबतच पिठगिरणीतील उर्वरित कणिक न विकता ते गुरांना खाऊ घालण्याचे पुण्यकर्म करीत आहे.
गोसेवेचा ध्यास घेतलेल्या सरदार यांनी आपल्या पिठगिरणीतील वाया जाणारे पिठ जमा करून ते जनावरांना खाऊ घालण्याचे काम सुरू केले आहे. भुकेसोबत त्यांची तृष्णा कशी भागेल, हा विचारही त्यांनी केला. यासाठी त्यांनी समोरच एक सिमेंटचे टाके ठेवले. यात पाणी भरून असल्यावर जनावरे त्यांचा वापर पाणी पिण्यासाठी करताना दिसून येतात. या टाक्यात पाणी भरून ठेवण्याचे कार्य ते कित्येक वर्षांपासून करीत आहेत. भूक आणि तृष्णा भागल्याने जनावरेही तृप्त होतात. उन्हाळ्यात आपल्या घरी पाणी समस्या असताना प्रशांत सरदार यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.
ग्रा.पं. कडून कधी पाणी पुरवठा होतो तर कधी खंड पडतो. अशा स्थितीतही ते टाक्यात पाणी भरून ठेवण्याचे कार्य करतात. हा उपक्रम सर्वत्र राबविला गेला तर जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागणार नाही. पावसाळ्यात तहान भागविण्यासाठी नाले, ओंढे, नदी असतात; पण रखरखत्या उन्हात हे सर्व आटतात. किंबहुना विहिरींची पातळीही कमी होते. परिणामी, जनावरेही तहानेने व्याकुळ होत असल्याचे दिसते. अशात सरदार यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे. ही पाण्याची व्यवस्था समाजासाठीही प्रेरणादायी कार्य ठरणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल प्रशासनाने घेऊन प्रशासनानेही जनावरांच्या पाणी समस्येबाबत उपाययोजना करावी. जेणेकरून त्यांची तहान भागविण्यात अडचण निर्माण होणार नाही.
व्यवसायासोबतच भूतदया
प्रशांत सरदार यांचे उदरनिर्वाहाचे साधन सदर पिठगिरणी व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा कित्येक वर्षांपासून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचे घर हे पुलगाव ते नाचणगाव मार्गावर असल्याने तेथे मोकाटही जनावरांची ये-जा असते. कधी -कधी तर सरदार यांच्या पिठगिरणीसमोर पाण्याचे टाके आणि कनकेचे गोळे दिसत असल्याने जनावरांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही भूतदया अनेक गुरांना जगवित असल्याचे दिसून येत आहे.