अमरावतीमधील प्राणी वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:03 PM2018-09-10T22:03:57+5:302018-09-10T22:04:25+5:30
पैशाच्या वादातून उघड्यावर पडलेल्या अमरावती येथील अमर सर्कसमधील प्राण्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण समजून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती वर्ध्याच्या पीपल्स फॉर अॅनिमलला दिली. प्राण्यांकरिता कार्यरत असलेलया या संस्थेने रविवारी सकाळी सर्कसमधील २० जनावरांना ताब्यात घेऊन वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :पैशाच्या वादातून उघड्यावर पडलेल्या अमरावती येथील अमर सर्कसमधील प्राण्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण समजून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती वर्ध्याच्या पीपल्स फॉर अॅनिमलला दिली. प्राण्यांकरिता कार्यरत असलेलया या संस्थेने रविवारी सकाळी सर्कसमधील २० जनावरांना ताब्यात घेऊन वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल केले.
अमरावती येथील सर्कस मैदान पाच लाख रूपये भाड्याने घेऊन येथे सर्कस सुरू करण्यात आली. मात्र, भाड्यापोटी अमरावती जिल्हा परिषदेला दिलेला धनादेश अनादरीत झाल्याने या सर्कस मालकाविरोधात पोलिसात तक्रार केली. तक्रार दाखल होताच सर्कस मालकाने कलावंतांसह पळ काढला. सर्कस मालकाने पळ काढल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सर्कसच्या साहित्याचा लिलाव करून आपले नुकसान भरून काढण्याचा निर्णय घेतला.
लिलावाची माहिती मिळताच जप्तीत असलेल्या जनावरापैकी तीन उंटासह काही कलाकार पसार झाले. यातच तीन दिवस सुटी असल्याने या जनावरांची अडचण होईल, असे लक्षात आल्याने अमरावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडून ही जनावरे वर्ध्याच्या पीपल्स फॉर अॅनिमलच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार ही जनावरे वर्धेत आणण्याकरिता पीपल्स फॉर अॅनिमलचे आशीष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, यांच्यासह कार्यकर्ते अमरावती येथे दाखल झाले असून जनावरे घेऊन वर्ध्यात आले आहेत.
सर्वच प्राण्यांची अवस्था बिकट
ताब्यात घेण्यात आलेल्या या प्राण्यांची अवस्था बिकट असून त्यांना औषधोपचार करण्याची गरज असल्याची माहिती पीपल्स फॉर अॅनिमलचे आशीष गोस्वामी यांनी दिली.
विविध पक्ष्यांसह घोडे अन कुत्रे झाले नवे पाहुणे
या सर्कसमधून पीपल्स फॉर अॅनिमलने विविध प्रजातीचे पाच पक्षी, सात घोडे, आठ कुत्रे अशी एकूण २० जनावरे ताब्यात घेतली आहेत. येथील करूणाश्रमात दाखल झालेल्या या नव्या पाहुण्याबाबत सर्वत्र कुतूहल निर्माण झाले आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना चकमकी दरम्यान सापडलेले नक्षलवाद्यांचे घोडेही येथेच आणण्यात आले होते.