जनावरे पडताहेत आजारी, अन् अधिकारी आपापल्या घरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 09:27 PM2022-10-18T21:27:15+5:302022-10-18T21:27:49+5:30
आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यामध्ये लम्पी स्किन रोगाने जनावरांवर अटॅक केला असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हळूहळू हा रोग पाय पसरायला लागला असून, जिल्ह्यामध्ये तब्बल २६६ जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले होते; परंतु तरीही या विभागातील अधिकारीच मुख्यालयी दांडी मारत असल्याने इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यामध्ये लम्पीला अटकाव करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात साथ सुरू होताच, आपल्या जिल्ह्यामध्ये गोठ्यातील फवारणीला सुरुवात केल्याने या रोगाला रोखण्यात यश आले होते; परंतु आर्वी आणि आष्टी तालुक्यामध्ये जनावरांना या रोगाची बाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. बाधित जनावरे आढळून येताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बाधित गावांचा दौरा करून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश काढले होते. त्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
आपलं सोडून दुसऱ्या जिल्ह्यात सेवा
- जिल्ह्यामध्ये आधीच पशुसंवर्धन विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कसेबसे तत्कालीन सीईओ डॉ. ओम्बासे यांच्या पाठपुराव्याने प्रत्येक तालुक्यात कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. पण, या आपत्तीकाळात हे मनुष्यबळ अपुरे असल्याने आपल्या जिल्ह्यातील जनावरांचा मृत्युदर थांबविण्याची गरज असताना पशुसंवर्धन विभागाने एक-दोन नाही तर चार अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी पाठविले आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील स्थिती कशी सांभाळावी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.