पशुपक्षी मोकळे, माणूस बंदिस्त...केवळ तुझ्यामुळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:12+5:30
या पत्रातून त्यांनी कोरोनाच्या जन्मापासून तर आताच्या हाहाकाराचं सविस्तर वर्णन केलं आहे. त्या म्हणतात, ‘कोरोना’ हे तुझे नावही ऐकले ना की, धसकाच बसतो. आज तुझ्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. कोरोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ क्राऊन होतो. क्राऊन म्हणजे ‘मुकुट’, खरंच तू राजा ठरला आणि मुकुटही परिधान केलं. तुझा जन्म चीनमधला पण, तू सर्व जगात थैमान घालत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘या स्पर्धेच्या युगात कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नव्हता. प्रत्येक जण धावत सुटला होता. तू अचानक आल्याने या सर्वांची गती कमी नाही तर पूर्णपणे थांबलीस. फार अफाट ताकतीचा रे तू! आमच्या चक्रव्युव्हात आम्हीच फसलो, अगदी अभिमन्यूप्रमाणे. आणि हो, आम्हाला प्रदूषणाची जी समस्या भेडसावत होती, तीदेखील तुझ्या येण्याने नष्ट झाली आहे. कमालच आहे बुवा कोरोना तुझी, पशुपक्षी मोकळे आहेत आणि माणूस आपल्याच पिंजऱ्यात बंदिस्त झाला’, असे कोविड-१९ या विषाणूचे वास्तव हिंगणघाट तालुक्याच्या सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका शुभांगिनी वासनिक यांनी कोरोनाला लिहिलेल्या पत्रातून मांडले आहे.
या पत्रातून त्यांनी कोरोनाच्या जन्मापासून तर आताच्या हाहाकाराचं सविस्तर वर्णन केलं आहे. त्या म्हणतात, ‘कोरोना’ हे तुझे नावही ऐकले ना की, धसकाच बसतो. आज तुझ्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. कोरोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ क्राऊन होतो. क्राऊन म्हणजे ‘मुकुट’, खरंच तू राजा ठरला आणि मुकुटही परिधान केलं. तुझा जन्म चीनमधला पण, तू सर्व जगात थैमान घालत आहे. २०० नॅनो मीटरपेक्षाही सूक्ष्मजीव असतानाही तुझ्यासमोर आम्ही मानव ही खूपच खुजे वाटायला लागलो. आम्ही विकसित केलेले तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगती खूपच छोटी आहे, हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलेस. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला म्हणून सांगितले पण, आम्ही ऐकलं नाही. आता मरणाच्या भीतीने का होईना लोक खेड्याकडे पळत आहेत. ज्यांना विदेशात जाणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल वाटायचे त्यांना ‘भारत माझा देश आहे’ या वाक्याची आठवण झाली, ती केवळ तुझ्यामुळेच. तू हवेत तीन तास, तांब्यावर चार तास, कार्ड बोर्ड व कागदावर २४ तास, प्लास्टिकवर ७२ तास तर स्टीलवर ७२ तास जिवंत राहतो.५५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात तुझा मृत्यू होतो. तुझा आकार जरी सूक्ष्म असला तरी तू खुप मोठा आहेस. शाळा-कॉलेज, मंदिर, सिनेमागृह, कामधंदा व लग्नसमारंभही बंद झालेत.घर नसलेल्यांना काय विचारावं त्यांचं जगणंच भयंकर झालं. जीवावर उदार होऊन माणसे गावाकडे निघालीत. माणसांच्या गर्दीतून माणूस गायब झाला. सगळं असूनही माणूस एकटा झाला. गर्दीने भरलेले रस्ते एकाकी सामसूम झालेत. संकटकाळी देवाचा धावा करायचा तर आज तोही देऊळबंद झाला. कदाचित देवही माणसाच्या स्वार्थी वृत्तीला कंटाळला असेल. आमचे देवरूपी डॉक्टरांचे दरवाजे मात्र सदैव उघडे आहेत. तू कितीही मोठा घात करणारा व्हायरस का असेना परंतू, आमच्या डॉक्टरांनीही तुला रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवलीय. आपल्या कर्तव्यासाठी त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. मंदिरापेक्षा आपल्याला दवाखान्यांची जास्त गरज आहे, हे गाडगेबाबांनी सांगितले होते. पण, आम्हाला कधी कळलंच नाही. बऱ्याच गोष्टी आम्हाला कळत होत्या पण, वळत नव्हत्या. मात्र, आता या सर्वांच महत्त्व कळायला लागलं फक्त तुझ्यामुळे. हात स्वच्छ धुणे, शिंका, खोकला आला की रुमाल समोर पकडणे. हात पाय धुवूनच घरात जाणे. पादत्राणे बाहेर काढणे, नमस्कार करणे, हे आमचे संस्कार. या संस्काराची पुन्हा उजळणी करून घेतलीस. गर्दीमध्ये धक्के मारणारे आम्ही. आता दुरूनच उभे राहायला शिकलो. भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते तू एका फटक्यात करून दाखवलंस. कायद्यालाही न जुमानणारे आम्ही आज तुझ्या भीतीमुळे एका शिस्तीत आलो. पोलीस खात्याला शिव्या देणारे आम्ही मात्र आज तेच पोलीस खातं दिवस-रात्र आमच्यासाठी झटत आहे. घरातच बंदिस्त झाल्यामुळे घराला घरपण आलं. थांबला तो संपला, असच आतापर्यंत आम्हाला माहित होतं. पण आज जो थांबणार तोच जिंकणार हेही शिकवणारा तुच आहेस. इतर प्राण्यांपेक्षा माणूस नक्कीच वेगळा आहे, काही गोष्टी त्याच्याकडे उपजतच आहे. पण निसर्गाला आव्हान देण्याइतपत आपण नक्कीच मोठे नाही. खरचं तू खूप काही शिकविलंस. तुझ्या पुढे आज आम्ही नतमस्तक झालो रे... तू ही निसगार्चाच भाग ना, मग आपण निसर्गबंधूच. मग ऐक ना, सोड आता, घेऊ दे परत एकदा श्वास या मोकळ्या आकाशात. तो काटेरी मुकुट ही तूच ठेव, आम्हाला काहीच, फक्त जगू दे... पडू दे ना अन्नाचे दोन घास व घोटभर पाणी त्यांच्याही पोटात; जे रस्त्याच्या बाजूला झोपड्यात राहतात. आम्ही चुकलो तर परत ये पण, आता परत जा...अशी विनवणीही या पत्रातून केली आहे.
जीवघेण्या कोरोनाने सर्व काही ठप्प केले आहे. पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असताना मानव मात्र चार भिंतींआड बंदिस्त झाला आहे. नागरिकांना उद्देशून हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगिनी वासनिक यांनी कोरोनाला लिहिलेले पत्र.