सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:45 PM2017-10-31T23:45:52+5:302017-10-31T23:46:05+5:30
बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/घोराड : बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले. सवंगणीच्या कामावर झालेला खर्च निरर्थक गेला. आता मळणीवर खर्च करायचा नाही, असे भूमिका घेत शेतकºयाने सोयाबीन गुरांना चारले.
सेलूच्या उपबाजार समितीमध्ये काळसर पडलेल्या सोयाबीनला २०० रुपये क्विंटलच्या भावात मागणी करण्यात आली होती. या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता सेलू तालुक्यातील घोराड या गावातील शेतकरी बंडू शंकरराव तडस यांनी सोयाबीनचे पीक गुरांच्या स्वाधीन केले आहे. सोयाबीनची सवंगणी करून त्यांनी पीक शेतातच ढीग लावून ठेवले होते. सर्व ढीग उचलून एकत्र करणे आणि मळणी यंत्रातून सोयाबीन काढणे, ही प्रक्रिया शिल्लक होती. बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांकडे लक्ष ठेवणाºया शेतकºयाने सोयाबीनचा रविवारचा भाव पाहिला व पीक गुरांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे पीक खराब झाले होते. शेंगांतील दाणे काळे पडले असल्याने बाजारपेठेत त्या सोयाबीनची कवडीमोल भावात मागणी होईल. ही मागणी आपल्याला व्यथित करणारी ठरेल. यापेक्षा आपल्या गुरांच्या पोटाची खळगी या पिकाने का भरू नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षीही काही शेतकºयांनी असाच निर्णय घेत सोयाबीन, कपाशीचे पीक गुरांच्या स्वाधीन केले होते. यंदाही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी शेतामध्ये गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सोमवारी सेलू तालुक्यात घडलेला हा प्रकार काही दिवसांत अन्य तालुक्यांत दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. यात शेतकºयांचे मात्र प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकºयांची खिल्ली उडविणारा प्रकार
पावसामुळे सोयाबीन भिजले. यामुळे ते नाफेडमार्फत खरेदी केले जात नाही. बाजार समितीमध्ये व्यापारी सोयाबीनला अत्यल्प भाव देत आहेत. रविवारी तर केवळ २०० रुपये क्ंिवटलचा दर सांगण्यात आले. हा प्रकार शेतकºयांची खिल्ली उडविणारा ठरत आहे. इतका कमी दर मिळत असताना शासकीय यंत्रणा कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसते. अशीच स्थिती राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, हा प्रश्नच आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, अशा प्रतिक्रीया शेतकरी शालिग्राम चाफले यांनी व्यक्त केली.
अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त नाही
सेलूच्या बाजार समितीमध्ये अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. खासगी व्यापाºयांकडूनच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. चांगल्या शेतमालालाही नगण्य भाव दिले जात आहेत. कमकुवत असलेल्या शेतमालाकडे येथे कुणीही पाहत नाही. शिवाय शासकीय खरेदीदारही हा कमकुवत माल घेत नाहीत, हे विशेष! या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी शेतातील उभ्या पिकांत गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. वर्धा तालुक्यातही अनेक शेतकºयांनी सोयाबीनची मळणीच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतकºयांकडूनही शेतमाल गुरांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकºयांचे श्रम मात्र व्यर्थ जात आहेत.