आंजीला होणार ग्रामीण रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:23 PM2019-08-06T21:23:54+5:302019-08-06T21:24:19+5:30
आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी सातत्याने लावून धरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील आंजी (मोठी) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील जवळपास ३४ गावांचा समावेश होतो. तसेच हे गाव आर्वी- वर्धा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनिल गफाट यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ आॅगस्टला प्राथमिक आरोग्य कें द्राच्या ठिकाणी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे.
आंजी (मोठी) हे जिल्हा परिषदेचे सर्कल असून आंजी या गावातून आर्वी-वर्धा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या परिसरातील जवळपास ३४ गावांच्या आरोग्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर होती. तसेच पिपरी (मेघे), नालवाडी व मसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाजही आजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच चालायचे. त्यामुळे येथील कामाचा आवाका लक्षात घेता आंजीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी २०१४ पासून सभापती गफाट यांनी लाऊन धरली होती. अखेर या मागणीला शासनाची मान्यता मिळाली आहे. या रुग्णालयाकरिता विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम करण्याकरिता अंदाज आराखडे तयार करुन प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करावे. तसेच पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल,असे आदेशात नमुद केले आहे.
वाढती लोकसंख्या आणि कामाचा आवाका लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयाची मागणी करण्यात आली. आमदार अनिल सोले यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी स्वत: लक्ष दिले. परिणामी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंजुरी दिली. त्यानंतर या प्रस्तावाला वर्ध्यात येण्याच्या तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. या सर्वांच्या सहकार्याने येथे ग्रामीण रुग्णालय बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.
जयश्री सुनील गफाट, सभापती, आरोग्य व शिक्षण समिती