‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:33 AM2022-02-11T08:33:26+5:302022-02-11T08:34:18+5:30

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले.

‘Ankita’ gets justice second Memorial Day; death in the Nagpur on February 10, 2020 | ‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत

‘अंकिता’ला मिळाला द्वितीय स्मृतिदिनी न्याय; १० फेब्रुवारी २०२०ला नागपूरला मालवली होती प्राणज्योत

Next

भाष्कर कलोडे - 

हिंगणघाट (जि. वर्धा) :  हृदयाला चटका लावणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा निकाल अखेर गुरुवारी दुपारी लागला. १५० पानांच्या निकालात न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. मृत प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला तिच्या द्वितीय स्मृतिदिनी या निकालाने न्याय मिळाला.

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना, आरोपी विकेश याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. गंभीर जखमी पीडितेची नागपूर येथील रुग्णालयात १० फेब्रुवारी २०२० ला प्राणज्योत मालवली. नेहमी वर्दळ राहणाऱ्या चौकातच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. घटनेचे राज्यात विविध ठिकाणी पडसादही उमटले.

कठोर मनाने ऐकला आरोपीने निकाल
हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी न्यायालयात आणण्यात आले हाेते. न्यायालयाने दिलेला निकाल विकेश याने कठोर मन करून ऐकला. निकाल ऐकल्यावर विकेश याची स्थिती सामान्य होती. निकाल जाहीर झाल्यावर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून सायंकाळी पाच वाजता विकेशची पोलीस बंदोबस्तात कारागृहात रवानगी करण्यात आली.

दारोडा गावावर पोलिसांचा वॉच
जळीत प्रकरणातील पीडिता अंकिता आणि विकेश हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावातील रहिवासी असल्याने निकालानंतर गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंगणघाट जळीत प्रकरणाचा गुरुवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यावर पुढील निर्णय घेऊ. - ॲड. उज्ज्वल निकम, विशेष शासकीय अभियोक्ता.

निकालाच्या प्रती मिळाल्यावर आपण त्याचा बारकाईने अभ्यास करून विकेश नगराळे याला न्याय मिळून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागू. - ॲड. भूपेंद्र सोने, आरोपीचे वकील

निकालाने समाधानी
अंकिताला जिवंत जाळणाऱ्या विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला न्यायालय फाशीची शिक्षा देईल, अशी आशा होती; पण गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे आपण स्वागतच करतो.     - अरुण पिसुड्डे, मृत अंकिताचे वडील
 

Web Title: ‘Ankita’ gets justice second Memorial Day; death in the Nagpur on February 10, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.