ऐन हिवाळ्यात कॅनल कोरडा
By admin | Published: January 8, 2017 12:39 AM2017-01-08T00:39:54+5:302017-01-08T00:39:54+5:30
रब्बी हंगामात सर्वत्र चना, गहू पिकांना ओलितासाठी पाण्याच्या सुविधेसाठी सिमेंट कॅनलची सुविधा करण्यात आली.
ओलिताची पंचाईत : स्थिती पाहून अधिकारीही अवाक्
आर्वी : रब्बी हंगामात सर्वत्र चना, गहू पिकांना ओलितासाठी पाण्याच्या सुविधेसाठी सिमेंट कॅनलची सुविधा करण्यात आली. असे असताना आर्वी तालुक्यातील सावळापूर येथील कोरडा सिमेंट बंधारा पाहून संबंधित विभागाचे अधिकारीही अवाक् झाले.
राज्य शासन व मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा कशी देता येईल यावर राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती. यात जिल्हा व तालुका स्तरावर शेतशिवार परिसरात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सिमेंटचे कॅनल बांधण्यात आले. या कॅनलचे बांधकाम खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून बांधण्यात आले; पण या कॅनलमध्ये रबी हंगामाचे पाणी सोडण्याआधीच या कॅनलला भेगा पडल्याने यात येणारे पाणी वाहून जात आहे. यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात सावळापूर येथील हा सिंचनाचा कॅनल कोरडा पडला असल्याचे दिसत आहे.
डिसेंबर महिन्यात या कॅनलला शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणी द्यायचे असताना हा कॅनल कोरडा झाला आहे. यावर सावळापूर येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर सोमकुंवर यांनी संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता सुदेश चचाणे, शाखा अभियंता भारती यांनी या कॅनलची प्रत्यक्ष पाहणी केली. या कॅनला भेगा पडल्याचे निर्दशनास आल्याने तेही अवाक् झाले. या कॅनलला जागोजागी भेगा पडल्या असल्याचे दिसून आले.
जलसंधारणाचे ७० लाख वाया
या बांधलेल्या कॅनलमधून रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिकाचे पाणी कॅनल निकृष्ट दर्जाचा असल्याने वाहुन गेल्याने हे कॅनल कोरडे पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या परिसरातील पाणी अडविण्यासाठी जलसंधारण विभागाने ७० लाख रुपये खर्च करुन पाणी अडविण्यासाठी तीन बंधारे बांधले; परंतु तेही पाणी अडविण्यासाठी कुचकामी ठरले आहे.