हिवरा (तांडा)तील कोरोना ‘ओपनिंग’ची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:00 AM2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:12+5:30
गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला अन् आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. रुग्ण निघाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यांवरही शुकशुकाट होता. आता वर्षभरात तब्बल ४१ हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३३ हजार ८३६ जणांनी कोविडवर मात केली, तर १०१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मृत महिलेचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ती इतर गावांतही दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले होते. एकीकडे वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असताना दुसरीकडे सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेला वाशिम जिल्ह्यातील ६४ वर्षीय रुग्णही पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समजल्याने आणखी भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. विशेष म्हणजे वर्षभरात आढळलेल्या रुग्णांच्या बरोबरीने एकट्या मे महिन्यात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेतील मे महिन्यापेक्षा दुसऱ्या लाटेतील मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूदरातही कमालीची वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एक हजारांवर गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढत चालले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३३ हजार ८३६ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
‘ती’च्या अंत्ययात्रेला उसळली होती गर्दी अन् उडाली झोप
महिलेच्या मृत्यूपश्चात तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशातच तिच्या अंत्यविधीला चांगलीच गर्दी उसळली होती. त्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांचा शोध घेऊन तपासणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. प्रशासनाकडून हिवरा गावापासून तीन कि.मी. अंतरावरील हर्रासी, राजनी, जामखुटा, पाचोड, बेलारा तांडा या गावांचा परिसरही सील करण्यात आला होता, तसेच अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांना होम, संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.