१,३४० गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर
By admin | Published: April 1, 2016 02:19 AM2016-04-01T02:19:23+5:302016-04-01T02:19:23+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शेतकऱ्यांना सर्वच सुविधा मिळणार
वर्धा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता. अशात मध्यंतरी शासनाने वर्धा जिल्ह्यातील एकही गावात दुष्काळ नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर होता. आता मात्र शासनाकडून जिल्ह्यातील १ हजार ३४० गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.
जिल्ह्यात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे २० आॅक्टोबर २०१५ च्या शासननिर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या सर्वच सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय २३ मार्च २०१६ रोजी निर्गमिक करण्यात आला आहे. खरीप, रब्बी हंगामातील पैसेवारी पन्नास पेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध योजना शेतकऱ्यांकरिता देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील २०१५-१६ या वर्षातील खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये वर्धा तालुक्यातील १५४ गावे, सेलू तालुक्यातील १६७, देवळी १४९, हिंगणघाट १८७ गावे, समुद्रपूर २१९, आर्वी २०८ गावे, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावे अश्ी एकूण १ हजार ३४० गावांचा समावेश आहे. या गावांना सर्वच सुविधा मिळणार आहे.(प्रतिनिधी)