दीड दशकात ॲनोफिलीस जातीच्या डासांनी घेतले सहा बळी
By महेश सायखेडे | Published: April 25, 2023 05:21 PM2023-04-25T17:21:33+5:302023-04-25T17:22:17+5:30
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे ठरते फायद्याचे
वर्धा : मलेरिया म्हणजेच हिवताप. हा एक संसर्गजन्य आजार असून, मलेरिया हा आजार ॲनोफिलीस जातीचा बाधित डास चावल्यामुळे होतो. डासांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपैकी मलेरिया सर्वांत धोकादायक मानला जातो. मागील दीड दशकात वर्धा जिल्ह्यात मलेरिया या आजाराची ४ हजार ४१९ व्यक्तींना लागण झाली. तर याच काळात तब्बल सहा व्यक्तींचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव असून, त्याबाबतची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. तसे आवाहन आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडूनही केले जाते.
कसा होतो मलेरिया?
संबंधित डास जेव्हा चावतो तेव्हा प्लाज्मोडियम परजीवी हे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर परजीवी रक्तामधून त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात. परजीवी रक्तात मिसळून त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींना बाधित करतात, असे सांगण्यात आले.
मलेरियाचे प्रकार
प्लाज्मोडियम वायवॅक्स, प्लाज्मोडियम ओवेल, प्लाज्मोडियम फैल्सिपैरम, प्लाज्मोडियम मलेरिया हे चार मलेरियाचे प्रकार असल्याचे सांगण्यात आले.
मलेरियाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे, थांबून-थांबून अधिक ताप येणे, डोकेदुखी, मळमळ व उलट्या, पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे, नाडीची गती जलद होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, अंगदुखी, शरीरात वेदना होणे ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे आहेत.
कुठल्या वर्षी किती मृत्यू?
* २००८ : ०१
* २०११ : ०१
* २०१२ : ०२
* २०१५ : ०२
मलेरिया हा कीटकजन्य आजार असून, लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा