भदाडी नदीच्या पुलावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर; दुभाजकावर धडकली कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:36 PM2022-08-16T18:36:22+5:302022-08-16T18:38:28+5:30
भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. याठिकाणी अपघातप्रवण स्थळ म्हणून फलक लावावा, अशी मागणीही आता नागरिक करीत आहे.
वर्धा : चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरभाव कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली आहे. हा भीषण अपघात सेलसुरा नजीकच्या भदाडी नदीच्या पुलावर १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वैभव बोधलकर, योगेश चावके दोन्ही रा. यवतमाळ अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
वैभव बोधलकर आणि योगेश चावके हे दोघे एम.एच. २९ बी.वाय. २९१८ क्रमांकाच्या कारने वर्ध्याकडे येत होते. दरम्यान चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि भदाडी नदीच्या पुलावरील रस्ता दुभाजकाला धडकली. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला. भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने कारच्या समोरील भागाचा चुराडा झाल्याने मोठे नुकसान झाले.
भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात
सेलसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. याच ठिकाणी एका कारचा अपघात झाला होता. या अपघातात सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा जीव गेला होता. त्यानंतरही अनेक अपघात झाले. भदाडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात असल्याचे नागरिक बोलू लागले आहे. याठिकाणी अपघातप्रवण स्थळ म्हणून फलक लावावा, अशी मागणीही आता नागरिक करीत आहे.