तीन पोलिसांनी ‘खाकी’ला लावला डाग, लाच स्वीकारल्याने अडकले जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 02:20 PM2022-01-21T14:20:19+5:302022-01-21T18:39:56+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील तीन वर्षांत ३ लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत जाळ्यात अडकविल्याची माहिती आहे.
वर्धा : कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांच्या खांद्यावर आहे. मात्र, हेच पोलीस जेव्हा सर्वसामान्यांकडून लाचेची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाते. काही लाचखोर पोलिसांच्या अशा कृत्यामुळे अख्खा पोलीस विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडतो.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील तीन वर्षांत ३ लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत जाळ्यात अडकविल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल न करणे, दाखल गुन्ह्यातील कलम कमी करून गुन्ह्याचे गांभीर्य कमी करणे, हप्ता वसुली करणे, आदी विविध कारणांसाठी काही पोलिसांकडून पैशांची मागणी केली जाते. यात संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास सापळा रचून कारवाई केली जात आहे. अशा लाचखोरांना तत्काळ निलंबित केल्या जात असून, शिक्षा लागल्यास बडतर्फ करण्यात येत असल्याची माहिती आहे.
कुणी लाच मागत असेल तर येथे करा संपर्क
लाच घेणे व देणे दोन्ही गुन्हा आहे. कुणी जर कायदेशीर कामासाठी, शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी आपणास शासकीय फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कुणी बेकायदेशीर काम करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्यास लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा.
लाचखोरीत पोलीस तीन नंबरवर
२०१९ ते २०२१ या तीन वर्षांचा विचार करता, लाचखोरी संबंधाने सापळा कारवाईत झालेल्या विभागातर्फे महसूल विभाग, वनविभाग व नंतर पोलीस विभाग असल्याचे झालेल्या कारवाईवरून दिसून आले आहे.
लाच घेण्यासाठी नेमले ‘पंटर’
विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी आपले काम करण्यासाठी तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी किंवा कलम कमी लावण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी ‘पंटर’ नेमले आहेत. त्या पंटरच्या माध्यमातून काही कर्मचारी अन् अधिकारी लाचेची रक्कम घेत असल्याचे झालेल्या कारवाईतून पुढे आले आहे.