व्हीजेएमची पवनारात डेंग्यूविरोधी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:06 AM2017-11-24T01:06:18+5:302017-11-24T01:06:39+5:30
जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात पहिले विरूळ आणि आता पवनार या भागात डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहे. याच संवेदनशील मुद्यावर सतत कार्यरत असलेले वैद्यकीय जनजागृती मंचाने विरूळनंतर पवनारला भेट देत तिथे डेंग्यू आजाराबद्दल लोकजागृती केली. डेंग्युवर प्रतिबंध लावण्याकरिता स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. यामुळे ग्रामीण भागात स्वच्ठता आणि रोगाच्या लक्षणाची माहिती देण्यात आली आहे.
वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १५७ लोकजागृती कार्यक्रमातून विविध आजाराची माहिती दिली आहे. तसेच सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला जाळ्या लावून दिल्या. याचवेळी लोकांना परिसर स्वच्छतेचे आवहन करीत डास निर्मूलनाची शपथ दिली.
डेंग्यूविषयी सविस्तर माहिती असलेली परिपत्रके पण बाजार चौकात आणि परिसरात वाटण्यात आली. मार्गदर्शन करताना व्हीजेएमचे डॉ. सचिन पावडे, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. राजेश सरोदे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. अलोक बिस्वास, डॉ. आनंद गाढवकर, श्याम भेंडे यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने गुरुवारी पवनारच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. इथेही डेंग्यू बाबत मार्गदर्शन केले. डेंग्युची लक्षणे आणि त्यावर उपाययोजनांची माहिती दिली. गावातील बाजार चौकात लोकांना आरोग्य विषयी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच अजय गांडोळे, ग्रा.प्ं. सदस्य अशोक भट, नंदा उमाटे, वर्षा बांगडे, अर्चना डगवार, ज्योत्सना गवळी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.