व्हॉट्सॲपवर एपीके फाइल आली अन् खाते साफ करून गेली ! ऑनलाइन पैसे उकळण्यासाठी नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 05:17 PM2024-12-05T17:17:43+5:302024-12-05T17:18:58+5:30

Wardha : ठगबाजांनी शोधले नवे जाळे शासकीय योजनांच्या नावाने व्हायरल

Apk file arrived on WhatsApp and the account was cleared! A new way to earn money online | व्हॉट्सॲपवर एपीके फाइल आली अन् खाते साफ करून गेली ! ऑनलाइन पैसे उकळण्यासाठी नवी शक्कल

Apk file arrived on WhatsApp and the account was cleared! A new way to earn money online

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
ठगबाजांकडून ऑनलाइन पैसे उकळण्यासाठी रोज नवी शक्कल लढवली जाते. आता शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाइल्स व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्या जात आहेत. अशी फाइल आपल्या परिचयातील व्यक्तीकडून व्हायरल होऊ शकते. ओळखीच्या व्यक्तीने शासकीय योजनेची माहिती पाठवली म्हणून आपला विश्वास बसतो. कोणतीही खातरजमा न करता थेट ही फाइल डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो, यातच फसगत होते. मागील ११ महिन्यांत सायबरकडे ४० ते ५० वर तक्रारी दाखल असून, यात सुमारे २० ते २२ लाखांवर फसवणूक झाल्याची माहिती आहे.


एपीके फाइल्स इन्स्टॉल करताच मोबाइलचा पूर्ण अॅक्सेस ठगबाजाकडे जातो. कोणतीही फाइल डाऊनलोड करण्यापूर्वी ती कोणती फाइल आहे, हे तपासून घ्यावे. ज्या ओळखीच्या व्यक्तीने असा माहितीपर मेसेज, लिंक पाठवली, त्याच्याकडे याबाबत खातरजमा करावी. त्याला कुठून मिळाली, या महितीचा स्रोत काय हे स्पष्ट करूनच अशा फाइल्स मोबाइलमध्ये उघडण्याचा प्रयत्न करावा. 


ठगबाज एपीके फाइल पाठवून ती मोबाइल वापरणाऱ्याने इन्स्टॉल केली की, ठगबाज त्या मोबाइलचा ताबा घेतात. याची माहिती मोबाइल वापरणाऱ्याला होत नाही. त्याच्या खात्यातून पैसे काढले तरी त्याचे मेसेज दिसत नाही, अशी व्यवस्था करून ठगबाज संपूर्ण बँक खाते रिकामे करू शकतात. असे फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या लिंक, फाईल्सपासून सावध राहावे. 


अशी घ्या खबरदारी 

  • फाइल डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करून उघडू नये. फाइल उघडण्यापूर्वी ती कोणती आहे हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे. 
  • जेपीजी लिहिले असेल तर ती फोटो फाइल असते, एमपी ४ लिहिले असेल तर ती व्हिडीओ फाइल, डीओसीएस व पीडीएफ असेल तर ही डॉक्युमेंट फाइल असते. या डाऊनलोड केल्यास कोणताच धोका होत नाही.
  • मात्र, ज्या फाइलखाली एपीके लिहिले असते ती फाइल डॉक्युमेंट नसून अॅप्लिकेशन असते. यापासून मोबाइल हॅक होण्याचा धोका निर्माण होतो. एकदा मोबाइल हॅक झाला की पुढचे संकट ओडवते.


या आहेत शासकीय योजना 
पीएम किसान लिस्ट, घरकुल योजना, सीएससी सेंटर, एसबीआय रिवॉर्डस्, एमजीबी रिवॉर्डस्, सोलार पंप लिस्ट अशा विविध योजनांचे नाव वापरून त्याचे माहिती पत्रक पाठवत आहोत, असा देखावा केला जातो. ती एपीके फाइल असते. तिला इन्स्टॉल केल्यानंतर ठगबाज तुमचा मोबाइल सहज हाताळतो. तुमच्या मोबाइलवरून इतरांना अशी एपीके फाइल पाठवली जाते. या जाळ्यात एकाला अडकवल्यानंतर काही मिनिटांत अनेकांना फसवता येते.


चुकून एपीके इन्स्टॉल केल्यास हे करा
चुकून एपीके फाइल इन्स्टॉल झाली व मोबाइल हँग झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने मोबाइलचे इंटरनेट बंद करा. इन्स्टॉल केलेली एपीके फाइल, ॲप तत्काळ अनइन्स्टॉल करा. काहीवेळ फोन बंद करा, वेळ मिळताच मोबाइल फॉरमेट केल्यास पुढचा धोका टाळता येतो.


अन् बँक खाते होते साफ 
मोबाइलवरील फोन पे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझॉन यासारखे ॲप एपीके ॲप्लिकेशनमुळे सहज हॅक करून बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून पैसे कमी झालेले मेसेज येतात, ते सुद्धा हॅकर परस्पर डिलिट करून टाकतात. त्यामुळे आपल्याला पैसे काढल्याचा मेसेज दिसत नाही.


११ महिन्यांत ५० वर तक्रारी
सध्या सायबर भामट्यांकडून सोशल मीडियावर विविध लिंक्स, एपीके फाइल पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच जिल्ह्यातील नागरिकांना एपीके फाइल्स पाठवून गंडवल्याच्या सुमारे ४० ते ५० तक्रारी सायबरकडे दाखल असून, या प्रकरणात सुमारे २० लाखांहून अधिकची रक्कम भामट्यांनी परस्पर काढून घेत फसवणूक केली आहे.

Web Title: Apk file arrived on WhatsApp and the account was cleared! A new way to earn money online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.