कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोग लागू करा
By admin | Published: April 19, 2017 12:40 AM2017-04-19T00:40:52+5:302017-04-19T00:40:52+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा,
शेतकरी हक्क परिषदेतील ठराव : महात्मा फुले समता परिषदेचे आयोजन
वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, यासाठी स्वतंत्र व प्रभावी कायदा करावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कायद्याची ऐसीतैसी करू नये, असे ठराव शेतकऱ्यांनी एकमताने पारित केले. महात्मा फुले समता परिषदेद्वारे शेतकरी हक्क परिषद घेण्यात आली. यात शासन, प्रशासनाच्या निषेधासह अन्य पारित ठराव शासनाला सादर केले जाणार आहे.
हक्क परिषदेमध्ये कुण्याही प्रस्थापित नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, हे विशेष! शेतकऱ्यांनीच आपल्या व्यथा, वेदना या परिषदेत मांडाव्या. त्यावर चर्चा करावी आणि त्यातून सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकपणे संघटीत होऊन मार्ग काढावा, ही संकल्पना होती. शेतकरी प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ सर्वांना खुले ठेवले होते. शेतकरी हक्क परिषदेत नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या ३५ गावांतील शेतकरी हजर होते. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी या हक्क परिषदेमध्ये आले होते. यात शेतकरी महिलांचाही समावेश होता.
परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. महाराष्ट्रात व देशात स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचा प्रभावी कायदा करावा. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जिल्हाधिकारी व त्यांच्या संमतीने चाललेल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची दंडेलशाही बंद करावी. नागपूर-मुंबई महामार्गातील लँड पुलींग ही कायद्यातील बेकायदेशीर तरतूद त्वरित रद्द करावी, नवनगरांच्या नावाखाली वसणारी शहरे योजनेतून रद्द करावी. या महामार्गाची गरज नसल्याने तो रद्द करावा. जर शासनाला वाटाघाटीने शेतकऱ्यांकडून जमिनी हव्या असतील तर भूसंपादन कायद्याप्रमाणे पाचपट म्हणजे ८० लाख रुपये एकर जमिनीचा भाव जाहीर करावा व नंतरच वाटाघाटी कराव्या. सत्तारुढ पक्षाचे खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांबाबत जिथे भेटतील वा त्यांच्या सभेत जाऊन जाब विचारावा. यापुढे शेतकऱ्यांनी स्वत:च नेतृत्व करून आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. शेतकऱ्यांनी संघटीतपणे निराशग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या समस्या सोडवाव्या, असे विविध ठराव घेण्यात आहे. ते शासनाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहेत.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेतकरी हक्क परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अॅड. महेंद्र धोटे, मसुद खान पठाण, गंगाधर मुडे, रामराव मुडे, रमेश भोपळे, प्रा. मनोहर सोमनाथे, भाऊराव काकडे, सुधीर पांगुळ आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)