वाई गावासाठी स्वतंत्र सचिव नियुक्त करा
By admin | Published: January 8, 2017 12:48 AM2017-01-08T00:48:56+5:302017-01-08T00:48:56+5:30
नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे.
सरपंचाची मागणी : जि.प. सीईओंना साकडे
रोहणा : नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे. यामुळे ते १५ ते २० दिवस गावात येऊ शकत नाहीत. परिणामी, गावातील विकास कामे रखडली आहेत. गरजूंना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यातही अडचणी येत आहे. यामुळे वाई ग्रा.पं. मध्ये स्वतंत्र सचिवाची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी सरपंच गणेश गचकेश्वर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या मागणीकडे अद्याप लक्ष देण्यात आले नसून कायम सचिव मिळाला नाही. यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाई हे आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. लहान व मोठी पिंपळधरी या कोलाम वस्तींचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. शासन आदिवासींसाठी अनेक अनुदानाच्या य९ाजना राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती पुरविणे, आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायत सचिवाद्वारे केली जातात; पण या गावात सचिव १५ ते २० दिवसांतून कधीतरी दिसतात. आले तरी ते कधी येतात व कधी जातात, हे ग्रामस्थांच्या लक्षातही येत नाही. सचिव येत नसल्याने ग्रा.पं. च्या कर वसुलीची प्रक्रियाही पूर्णत: ठप्प आहे. परिणामी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही. पाणी पुरवठा योजनेची देयके थकित आहेत. विद्युत वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद करण्याची नोटी ग्रामपंचायतीला बजावली आहे. गावातील रस्ते बांधणी, नाल्यावर पावसाळ्यापूर्वी पूल व्हावा यासाठी पाठपुरावा करणे आदी कामांसाठी सरपंचांना सचिवाची साथ गरजेचे असते. यासाठी सरपंचांनी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिली होती. वाई ग्रा.पं. ला स्वतंत्र सचिव द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती; पण दोन्ही अधिकाऱ्यांनी ऐकून घेण्यापलिकडे काहीही केले नाही. परिणामी, गावाचा विकास थांबला आहे. ग्रामस्थाां आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी ताटकळावे लागत आहे. नाईलाजाने मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा सरपंच गणेश गचकेश्वर यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी मागणीकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.(वार्ताहर)