वर्षभरापूर्वी नियुक्ती मात्र महिला अधिकाऱ्याचे रुग्णालयाला वर्षभरापासून दर्शनच नाही तरी पगार मात्र थांबला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:15 IST2025-02-22T17:14:21+5:302025-02-22T17:15:35+5:30
वर्षभरापासून सावळागोंधळः अधिकाऱ्यांचेही साटेलोटे?

Appointed a year ago, the female officer has not been seen at the hospital for a year, but her salary has not stopped.
चेतन बेले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : 'आरोग्यम् धनसंपदा' आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी आहे, असे बोलले जाते. मात्र रुग्णालयात लक्ष्मी दर्शनातून रुग्णाच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून येत आहे. येथे एका महिला अधिकाऱ्याला वर्ग एक म्हणून वर्षभरापूर्वी नियुक्ती देण्यात आली. मात्र गत वर्षभरात त्या महिला अधिकाऱ्याचे कधी रुग्णालयाला दर्शनच झाले नाही. असे असताना पगार मात्र पूर्ण निघत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक सचिन तडस यांच्या कार्यकाळात एका महिला डॉक्टरची बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी म्हणून पदोन्नतीने ऑनलाइन नियुक्ती करण्यात आली होती. महिना दोन महिन्यांत त्या पदभार स्वीकारतील असे गृहित धरण्यात आले होते. मात्र नियुक्तीनंतर त्यांनी कधी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायरी चढलीच नाही. शल्य चिकित्यक बदलून गेले पण, वर्षभरापासून महिला अधिकारी आल्याच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोग्य व्यवस्था खिळखिळी, पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे....
जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा कशा पुरविता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्र्यांच्याच डोळ्यात धूळफेक करीत 'हम करो सो कायदा' असा काहीसा प्रकार चालविला आहे. काहींनी रुग्णालयातील कर्तव्य बाजुला सारत आपल्या खासगी रुग्णालयातच सेवा देण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी होत असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रुग्णालयात भोंगळ कारभार
यापूर्वी रुग्णालयात एका महिला डॉक्टरला बालरोग विभागात वर्ग-१ ची नियुक्त्ती दिली होती. मात्र त्यांनी कथी शस्त्रक्रीयाच केल्या नसल्याची नोंद आहे
तक्रार करुनही उपयोग काय? कारवाई दडपतातच !
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत कुण्या अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांना केल्यास तक्रार करणाऱ्यास त्याच्या दालनात जाऊन मारहाण करण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन नाही. ते जुने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्यांनाच संघर्ष करावा लागत असल्याने तक्रार करावी तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते जुने प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
उपसंचालकांकडे प्रस्ताव
बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी यांच्या पदाचा भार प्रभारीवर आहे. दोन पदांचा भार सांभाळताना अडचणी येत असल्याने वरिष्ठांना सूचना केल्या. मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पुढे आली आहे.
"अधिकारी ऑर्डर निघाल्यानंतर रुजू झाल्या नाही. या संदर्भात माहिती घेऊन सांगतो. पद रिक्त ठेवता येत नसल्याने पदाचा भार प्रभारीवर देण्यात आला आहे."
- डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय वर्धा.