नियुक्ती आदेश आले; पण रूजू होण्याबाबत उदासिनताच
By admin | Published: September 23, 2016 02:21 AM2016-09-23T02:21:55+5:302016-09-23T02:21:55+5:30
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे.
२६ पैकी १७ जणांना आदेश : केवळ दोघेच झाले रूजू
रूपेश खैरी वर्धा
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे. ही स्थिती सुधारण्याकरिता शासनाच्या आदेशनुसार जिल्ह्यातून २६ डॉक्टरांची निवड करून त्यांच्या अहवाल नियुक्ती आदेशाकरिता आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. यापैकी १७ जणांना नियुक्ती आदेश मिळाले. यापैकी केवळ दोघेच डॉक्टर सेवेत रूजू झाले. इतर १५ डॉक्टरांना नियुक्ती आदेश आले असताना ते अद्यापही रूज झाले नसल्याने ते शासकीय सेवेत येण्याकरिता उदासिन असल्याचे दिसत आहे.
आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नोंद असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्याकरिता शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना डॉक्टरांची थेट निवड करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार ११० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखत घेत २६ जणांची निवड केली. नियुक्ती केंद्रीय प्रक्रीया असल्याने त्यांचे आदेश आरोग्य मंत्रालयातून येत असल्याने या २६ डॉक्टरांना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा होती.
शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालातील २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना शासनाच्यावतीने दोन टप्प्यात नियुक्ती आदेश दिले. पहिल्या टप्प्यात नऊ आणि दुसऱ्या टप्प्यात आठ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले. पहिल्या नऊ जणांना आदेश येवून आठ दिवसांचा कालावधी झाला. यातील केवळ दोनच जण रूजू झाले आहेत. नियुक्तीपत्र मिळूनही इतर डॉक्टरांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात येत आपल्या नियुक्तीबद्दल कुठलीही शहानिशा केली नसल्याने नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. रिक्त जागी कोण डॉक्टर रूजू होतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.
सर्वांना हवे तालुक्याचे ठिकाण
जिल्हा आरोग्य यंत्रणेत निवड करण्यात आलेल्या डॉक्टरांना त्यांच्या मर्जीचे ठिकाण विचारूनच ते देण्यात आले होते; मात्र आता निवड झाल्यानंतर या डॉक्टरांना तालुक्याचे ठिकाण हवे असल्याची चर्चा जिल्हा आरोग्य विभागात आहे. आदेश आलेल्यांपैकी बऱ्याच डॉक्टरांना जिल्ह्याचे अथवा तालुक्याचे स्थळ पाहिजे आहे. यामुळे काही जणांच्या नियुक्तीची प्रक्रीया रखडली आहे.
तालुका स्थळी नियुक्ती घेत या डॉक्टरांकडून शासकीय सेवेत राहून आपले खासगी रुग्णालय थाटण्याचे प्रयत्न असतात. या डॉक्टरांकडून एकवेळा खासगी रुग्णालयांचे बस्तान बसल्यास त्यांच्याकडून शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होते, अशी आरोग्य विभागात चर्चा आहे. असे झाल्यास पुन्हा शासकीय आरोग्य यंत्रणा ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना आदेश मिळाले आहेत. असे असताना केवळ दोघेच जण रूजू झाले आहे. इतर आदेश आले नसून त्यांची प्रतीक्षा आहे. तसेच ज्यांचे आदेश आले त्यांच्या रूजू होण्याचीही प्रतीक्षा आहे.
- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.