सिंदी व चांदूर रेल्वे उड्डाण पुलांना रेल्वे मंत्रालयाची स्वीकृती
By Admin | Published: March 10, 2016 02:54 AM2016-03-10T02:54:08+5:302016-03-10T02:54:08+5:30
सिंदी (रेल्वे) व चांदूर (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयातर्फे स्वीकृत करण्यात आले आहे.
खासदारांची माहिती : रेल्वे मंत्र्यांचे लेखी उत्तर
वर्धा : सिंदी (रेल्वे) व चांदूर (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयातर्फे स्वीकृत करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथील पूल प्रलंबित असल्याने सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत खा. तडस यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न क्र. १६९ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून समस्या मांडल्या. या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सदर प्रस्ताव स्विकृत झाला असल्याची लेखी माहिती उपलब्ध करून दिली.
सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाण पुलाचे कार्य गतवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट झाले असून काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर कामाची निविदा प्रक्रिया प्रारंभ होईल. त्याच धर्तीवर चांदूर (रेल्वे) येथील उड्डाण पुलाच्या कार्याला राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात स्थान मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही देखील खा. तडस यांनी दिली.
सिंदी रेल्वे व चांदूर रेल्वे या दोन्ही पुलांची सामान्यांना प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकर दूर व्हावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाकरिता केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)