१३०.२५ कोटींच्या कामांना मान्यता
By admin | Published: March 11, 2016 02:33 AM2016-03-11T02:33:44+5:302016-03-11T02:33:44+5:30
लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५-१६ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
रामदास तडस यांची माहिती : अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार
वर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५-१६ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामांकरिता १३०.२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिल्ली येथून दूरध्वनीद्वारे दिल्याचे त्यांच्या कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र शासनाच्या केंद्रीयमार्ग निधी योजनेंतर्गत १५ मे २०१५ वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध १२ रस्ते विकास कामांना तत्वत: मान्यता देण्यात आली होती. त्याला अनुसरून केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे प्रस्तावित सर्व १२ रस्ते विकास कामाला ८ मार्च २०१६ रोजी प्रोजेक्ट झोन सहाच्या पत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले.
राज्य शासनातर्फे संबंधीत मुख्य अभियंत्यांना त्वरीत या कामांची बजेटप्लेट सादर करण्याबाबत सुचित करण्यात आले असून शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कामांचा समावेश करण्याकरिता प्रस्तावित करण्याबाबत संबंधीत यंत्रनेला खा. तडस यांनी निर्देश दिल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
या कामाकरिता त्यांना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे ना. नितीन गडकरी यांचे सहकार्य लाभल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)