उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्य पदारूढ
By admin | Published: December 28, 2016 12:39 AM2016-12-28T00:39:13+5:302016-12-28T00:39:13+5:30
जिल्ह्यातील सहाही नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची मंगळवारी निवड झाली.
सहा नगर परिषद : वर्धेत एका स्वीकृत सदस्याचा अर्ज नामंजूर तर आर्वीची निवडणूक पुढे ढकलली
वर्धा : जिल्ह्यातील सहाही नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची मंगळवारी निवड झाली. या निवडीची प्रक्रिया पालिका स्तरावर सकाळी सुरू झाली. सहापैकी तीन नगरपरिषदेत उपाध्यक्षाची निवड अविरोध झाली तर हिंगणघाट, पुलगाव व देवळी येथे निवडणूक झाली.
स्वीकृत सदस्याचे अर्ज नियमानुसार, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. त्या अर्जाची छानणी करून आलेल्या सदस्यांची नावे आज पालिका कार्यालयात घोषित करण्यात आली. जिल्ह्यातील सहाही पालिकेत असलेल्या १६ स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना वर्धेतील अभिषेक त्रिवेदी या स्वीकृत सदस्याचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे नामंजूर करण्यात आला. यामुळे वर्धा पालिकेत चार पैकी तीनच सदस्यांची निवड झाली. रिक्त असलेल्या एका स्वीकृत सदस्याकरिता १५ दिवसानंतर पुन्हा अर्ज सादर करून त्यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आर्वी पालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
उपाध्यक्षाकरिता हिंगणघाट, पुलगाव व देवळीत निवडणूक
उपाध्यक्षाच्या निवडणुकीत चंद्रकांत घुसे यांचा एकतर्फी विजय
हिंगणघाट- नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदावर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे हे विजयी झाले. दुपारी न.प. सभागृहात नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सत्तारुढ भाजपाकडून उपाध्यक्षपदासाठी चंद्रकांत घुसे यांचे नाव जाहीर झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिमा श्रीकृष्ण मेश्राम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. विकासाधीन अधिकारी बसंतानी यांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला. त्यावेळी भाजपाचे घुसे यांना ३४ तर राकॉच्या मेश्राम यांना चार मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे एकमेव सदस्य श्रीधर कोटकर तटस्थ राहिले. यावेळी चार स्विकृत नगरसेवकांचे नाव गटनेत्याने जाहीर केले. भाजपातर्फे रमेश धारकर, दादा देशकरी व मनोज वरघणे यांची नावे जाहीर केली तर राकाँचे गटनेते सौरभ तिमांडे यांनी पक्षातर्फे आफताब खान यांचे नाव पाठविले. या चारही नावांना सभागृहाचे एकमताने मंजुरी दिली. यावेळी आ. समीर कुणावार यांनी पालिकेत येत निवडून आलेल्या सदस्यांची भेट घेत त्यांना काही निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)
आर्वी न.प. उपाध्यक्षपदी पल्लवी काळे
आर्वी- नगर पालिकेत झालेल्या न.प. उपाध्यक्षपदी पल्लवी काळे यांची एकमताने निवड करण्यात आली. स्थानिक न.प. सभागृहात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यावेळी सभेत माजी आमदार दादाराव केचे यांनी सुचविलेल्या काळे यांच्या नावावर सर्व नगरसेवकांनी होकार दिला. यावेळी न.प. गटनेता म्हणून प्रशांत ठाकूर यांची निवड करण्यात आली. या सभेला मुख्याधिकारी गणेश शिंदे, विजय बाजपेयी, विनय डोळे, मिलींद हिवाळे, प्रकाश पाचघरे सह सर्व न.प. सदस्यांची उपस्थिती होती. येथील स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलण्यात आल्याने स्विकृत सदस्यांची नियोजित नावे यावेळी घोषित करण्यात आली नाही. (तालुका/शहर प्रतिनिधी)
देवळी उपाध्यक्षपदी नरेंद्र मदनकर
देवळी - स्थानिक न.प. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे प्रा. डॉ. नरेंद्र मदनकर विजयी झाले. तसेच न.प. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाचे अब्दुल नईम अब्दुल सत्तार व काँग्रेसचे सुरेश वैद्य यांच्या नावाची घोषणा झाली.
उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे मदनकर व काँग्रेसचे पवन महाजन या दोघांचे नामांकन आले. यामध्ये मदनकर यांना नगराध्यक्ष सुचिता मडावी यांच्या सहीत ११ न.प. सदस्यांनी हात वर करून मतदान केले. काँग्रेसचे महाजन यांना सहा मते पडली. मदनकर यांना १२ मते मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे न.प. निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल भाजपाचे स्वीकृत सदस्य अब्दुल नईम यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी ही कारवाई केली होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल नईम यांनी बकाणे यांच्याकडे माफीनामा लिहून दिल्यामुळे प्रकरण निवळल्याचे सांगितले जात आहे. अब्दुल नईम यांच्या उमेदवारीमुळे भाजपाच्या स्थानिक गटात चांगलीच अस्वस्थ्यता पसरली असल्याचे बोलल्या जात आहे. न.प. सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी यांनी काम पाहिले. सभेचे कामकाज न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख यांचे मार्गदर्शनात पाहण्यात आले.(प्रतिनिधी)