मांडगाव बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा मनमानी कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:09 PM2024-08-29T17:09:31+5:302024-08-29T17:10:01+5:30
खातेधारकांत रोष : बँकेकडून केली जाते अवाजवी वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मांडगाव : येथील बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू असून खातेधारकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. येथील बँकेचे व्यवहार मागील काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात असून खातेधारकांकडून अवाजवी वसुली केली जात असल्याची ग्राहकांत ओरड आहे.
मांडगाव येथील ग्रामपंचायतचे लिपिक उमेश विहिरकर हे १९ ऑगस्ट रोजी कामासाठी बँक पासबुक एन्ट्रीची प्रिंट मारायला गेले. मागील काही दिवसांपासून प्रिंटिंग मशीन बंद असल्याने पर्याय म्हणून बँक खात्याचे स्टेटमेंट मागितले. त्याचे शुल्क पडतील असे सांगण्यात आले. स्टेटमेंटची गरज असल्याने त्यांनी शुल्क भरून स्टेटमेंट देण्यात आले. मात्र तेही बँकेच्या विना विना सही शिक्याचे, आश्चर्य म्हणजे ७ पानांच्या स्टेटमेंट साठी तब्बल ८८५ एवढी रक्कम आकारण्यात आली.
हद्द तर तेव्हा झाली याच बँकेच्या जाम शाखेत काही ग्रामपंचायत कर्मचारी स्टेटमेंट करिता गेले असतांना Hello Wardha ३०४ ट्रान्झेक्शनच्या एन्ट्री स्टेटमेंट करिता १७७ रुपये आकारण्यात आले. त्याचप्रमाणे २८४ ट्रान्झेक्शनचे १७७, १८४ ट्रान्झेक्शनचे १७७ याप्रमाणे आकारण्यात आले. ३०४ ट्रान्झेक्शनचे स्टेटमेंट फक्त ४ पेजेसवर देण्यात आले. एकाच बँकेच्या २ शाखांमध्ये वेगवेगळे दर आकारण्यात येतात का? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारण्यात येत आहे. या प्रकराची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कर्ज प्रकरणात घेतली जाते दलाली?
"बँक ऑफ इंडियाच्या मांडगाव शाखेत जो लुटमारीचा प्रकार सुरू आहे हा भयानक आहे. अनेक कर्ज प्रकरणात दलाली घेतल्याशिवाय कर्ज प्रकरणे सेटल होत नाही, त्याचप्रमाणे लहान सहान कामाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस लावले जातात. ही परिस्थिती सुधरायला पाहिजे."
- हेमंत पाहुणे, संचालक कृउबा समिती समुद्रपुर
या प्रकाराची चौकशी करा
"मी सुशिक्षित तरुण असून माझ्याशी असे घडते, तर अशिक्षित खातेधारकांकडून किती रुपये वसूल केल्या जात असेल याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी."
-उमेश विहिरकर, अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी युनियन
"आम्ही जे चार्जेस आकारले आहे ते झोनल ऑफिसला विचारून आणि सर्क्युलर प्रमाणेच आकारण्यात आले आहे. त्यात वैयक्तिकरीत्या काहीच करता येत नाही. जाम शाखेने शुल्क कमी का घेतले ते मी नाही सांगू शकत नाही."
-किरण मोरे, शाखा प्रबंधक बँक ऑफ इंडिया मांडगाव